मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात हिंदी भाषेवरुन मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. त्यात काल तामिळनाडूच्या शिक्षण मंत्र्यांनी हिंदी भाषेबद्दल वादग्रस्त विधाने केले होते. त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच आता या वादामध्ये शिवसेनेचे सासदार संजय राऊत यांनी उडी घेतली असून राऊतांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान दिले आहे. शहांनी एक देश, एक संविधान आणि एक भाषा हे सूत्र लागू करण्याचे आव्हान स्विकारले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान करत हिंदी भाषा ही पाणीपुरीवाल्यांची भाषा आहे असे म्हटले होते. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. राऊत म्हणाले की, संपूर्ण भारतात हिंदी भाषा बोलली जाते. तसेच ती देशभरात स्वीकारला जाते. त्यासाठी सर्व राज्यांची एकच भाषा असली पाहिजे. त्यासाठी देशात एकच भाषा लागू करण्याचे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वीकारावे. अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर महिनाभरानंतर राऊत यांचे वक्तव्य आले आहे.
याआधी शहा म्हणाले होते की, इंग्रजीला पर्याय म्हणून ंिहदीचा स्वीकार केला पाहिजे, न की स्थानिक भाषा. त्यानंतर आता राऊतांनी ‘एक देश, एक भाषा’ हे सूत्र लागू करण्याबाबतचे आव्हान शहांनी स्विकारावे असे म्हटले आहे.