हिंगोली/प्रतिनिधी
हिंगोली तालुक्यातील पहेणी गावात आता धोक्याची घंटा वाजत असुन कालच मुंबईहुन परतलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे रात्रीच स्पष्ट झाले. यानंतर आज पहेणीतील क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या एका ११ वर्षीय मुलास कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल २६ मे रोजी शासकिय रुग्णालयास प्राप्त झाला आहे.
हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे सोमवारी १८ मे रोजी मुंबई येथून काही मजूर आले होते. त्या गावात आलेल्यांना शाळेमध्ये क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले. त्यानंतर एका ३० वर्षीय महिलेस सर्दी, ताप येत असल्याने त्यांना शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर सदर महिला कोरोना पॉझीटिव्ह असल्याचे काल २५ मे रोजी रात्री स्पष्ट झाले. या संदर्भातील माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी आरोग्य विभागाला कळविली.
Read More एमएचटी-सीईटी परीक्षा : विद्यार्थ्यांना 1 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत
उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी पहेणी गावात भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर क्वारंटाईन सेंटरमध्येच असलेल्या एका ११ वर्षीय मुलास कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. तो कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल आज शासकिय रुग्णालयास प्राप्त झाला. त्या मुलास तातडीने रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्ड मध्ये भरती करण्यात आले आहे.
दरम्यान, गावात आरोग्य कर्मचारी गोपाल भालेराव यांच्या मार्फत २० पथकांच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहे. सर्दी, ताप आदी लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती घेऊन त्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाकडे सादर केला जात आहे.