थोडक्यात बचावल्या, उपजिल्हा रुग्णालयात उपचार
केज : बीड जिल्ह्यातील केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकारी अधिका-यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने केजमध्ये या प्रकरणाची चर्चा होत आहे. कौटुंबिक वादातून आशा वाघ यांच्यावर हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानेच त्यांच्यावर हल्ला केला होता.
केज तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना घडली. आज दुपारी ४ च्या सुमारास आशा वाघ यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नायब तहसीलदार आशा वाघ आज दुपारी जेवण करून तहसील कार्यालयाकडे मोपेडवरून येत होत्या. त्याचवेळी एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला. त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर ४ जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बॉटलमधील पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या. केज येथील सरकारी रुग्णालयात आशा वाघ यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस या घटनेचा तपास घेत आहेत. हल्लेखोर फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर या आधीही जीवघेणा हल्ला झाला होता. कौटुंबिक वादातून त्यांचा भाऊ मधुकर वाघ यांनी हल्ला केला होता. जून २०२२ मध्ये मधुकर वाघ यांनी कोयत्याने आशा यांच्या मानेवर आणि डोक्यात वार केले होते. या हल्ल्यात नायब तहसीलदार आशा वाघ या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा कामावर रूजू झाल्या होत्या. पण आज त्यांच्यावर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाला आहे.