कोल्हापूर : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज ३३ दिवस झाले. पण या बेकायदेशीर सरकारला अजूनही तिसरा माणूस मिळाला नाही. या दोन मंत्र्यांच्या जम्बो कॅबिनेटमध्ये खरा मुख्यमंत्री कोण? असा सवाल जनतेला पडला आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आदित्य ठाकरे कोल्हापूर दौ-यावर आहेत. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा निशाणा साधला. सावंतवाडीतून येत होतो त्या ठिकाणी मी पर्यटन फंड दिला होता. त्याला स्थगिती मिळाली आहे. आदिवासी खात्याच्या जीआरला स्थगिती मिळाली आहे. पण त्यातून महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. पण स्थगिती द्यायला हे सरकार वैध आहे का? हे सरकार काळजीवाहू असेल तर ठीक आहे. पण ते किती घटनेला धरून आहे?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. कोण आदित्य ठाकरे? असा सवाल तानाजी सावंत यांनी केला होता. त्यावर आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला आहे. आम्हाला एकटं पाडण्याचा कट सुरू होता. ४० लोकांचा हा कट होता. पण आम्हाला जनता एकटं पाडणार नाही. त्यांचे बुरखे फाटत आहेत. त्यांचे खरे स्वरूप येत आहे. त्यांना कारवाई टाळायची होती. त्यामुळे ते आता बोलत आहेत. पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हा राजकीय दौरा नाही
माझा हा राजकीय दौरा नाही, असे त्यांनी सांगितले. अयोध्येत महाराष्ट्र भवन व्हावे म्हणून आम्ही उत्तर प्रदेश सरकारकडे प्रयत्न करत आहोत. योगी सरकारला आम्ही तशी विनंती केली होती. महाराष्ट्रात १० प्राचीन मंदिरे आहेत. त्याला आपण फंड दिलेला. पण त्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. हे सरकार स्वत:ला हिंदुत्ववादी सरकार म्हणत असेल तर याची नक्की काय परिस्थिती आहे? स्थगिती दिली आहे की हे काम पुढे नेणार आहात. हे सरकारने सांगितले पाहिजे, असे ते म्हणाले.
ठाकरे कुटुंब एकटे पडणार नाही
मी रात्रभर फिरत आहे. लक्ष देखील देत नाही. शिवसेना आणि ठाकरे परिवाराला एकटे पाडण्याचा कट हे सगळे ४० गद्दार करत होते. एकटे पाडण्याचे प्रयत्न पुरेपूर चालले आहेत. मात्र, राज्यातील जनता आणि शिवसैनिक ठाकरे कुटुंबाला आणि शिवसेनेला कधीच एकटे पाडणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.