मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख बुधवार दि. २८ डिसेंबर रोजी तुरुंगातून बाहेर आले. तब्बल १ वर्ष, १ महिना, २७ दिवसांनी त्यांची सुटका झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि इतर नेते, कार्यकर्त्यांनी देशमुख यांचे जोरदार स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या तातडीच्या मदतीबाबत अजित पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावली होती. मात्र, आज आपण मुंबईत जाणार असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले होते.
त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीच्या वेळेत बदल करत ही बैठक सकाळी १० वाजता बोलावली व दुपारी एक वाजता मुंबईला जाण्यासाठी आम्हाला विशेष विमान उपलब्ध करून दिले. त्यामुळे आज दुपारी १ वाजता मी व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते मुंबईला आलो आहोत. व त्याच विमानाने पुन्हा आजच नागपूरला परतणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.