४३ नवे आणि प्रलंबित अहवालातील २५ रुग्णांचा समावेश : लातूर-३५, निलंगा-१२, औसा-५, उदगीर-१०, देवणी-३, चाकूर-३
लातूर : जिल्ह्यातून येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत काल ३९४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी २५८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, ४३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ५९ जणांचा प्रलंबित, २९ जणांचा अनिर्णित, तर ५ जणांचा अहवाल रद्द करण्यात आला. दरम्यान, दि. १९ जुलै रोजीच्या प्रलंबित अहवालापैकी २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नवे ४३ आणि प्रलंबित अहवालातील २५ मिळून आज जिल्ह्यात एकूण ६८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यापैकी ६१ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील, तर ७ रुग्ण नवे आहेत. दरम्यान, लातूर तालुक्यासह शहरात सर्वाधिक ३५ रुग्ण वाढल्याने लातूरकरांची चिंता वाढली आहे.
लातूर जिल्ह्यात दररोज ५० पेक्षा जास्त रुग्णांची भर पडत आहे. मंगळवारीही जिल्ह्यात तब्बल ६८ नव्या रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये लातूर शहरासह तालुक्यातील चिंचोलीराव वाडी, मुरुड, पेठ येथील प्रत्येकी एक रुग्ण मिळून ३५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात शहरात कृपासदन शाळेजवळ तब्बल ५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच केशवनगर-४, विक्रमनगर-२, सीआरपीएफ कॅम्पमधील २ यासह शहरातील अन्य रुग्णांचा समावेश आहे.
निलंगा तालुक्यातही एकूण १२ नवे रुग्ण सापडले असून, निलंगा शहरातील सावता माळी चौक-३, औरंगपुरा, ज्ञानेश्वरनगरसह बोरसुरी-३, शिऊर-२ रुग्णांचा समावेश आहे. उदगीर येथेही १ नवा आणि ९ रुग्ण प्रलंबित अहवालातील असून, शहरातील देगलूर रोड-२, अशोकनगर, मेन रोडसह तालुक्यातील देवर्जन-३, शेल्हाळ, धोंडिहिप्परगा येथेही रुग्ण सापडले आहेत. देवणी तालुक्यात आणखी ३ रुग्णांची भर पडली असून, हे तिन्ही रुग्ण बटनपूर येथील आहेत. चाकूर तालुक्यातही ३ रुग्ण सापडले. त्यात लातूर रोड, नागेशवाडी, राचन्नावाडी येथील रुग्णाचा समावेश आहे. औसा तालुक्यातही ५ नवे रुग्ण सापडले असून, शहरातील रुग्णांसह तुंगी येथे एक नवा रुग्ण आढळून आला आहे.
रुग्णसंख्या १२२७ वर
जिल्ह्यात दररोजच नव्या रुग्णांची भर पडत असल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १२२७ वर पोहोचली आहे. यापैकी ४९१ रुग्णांवर उपचार सुरू असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६७० आहे. विशेष म्हणजे ४९१ पैकी तब्बल ४५९ रुग्णांची सौम्य लक्षणे आहेत. २४ रुग्ण आॅक्सीजनवर, तर ८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे.
आतापर्यंत ६६ जणांचा बळी
जिल्ह्यात कोरोना संसर्गाने मृत्यू पावणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ४६, उदगीर येथील सामान्य रुग्णालयात १६, चिंचवड पुणे येथे १, देवणी, निलंगा, औसा येथे उपचारादरम्यान प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
Read More लातूर जिल्हयातील १२३ ग्रामपंचायतीपंर्यंत पोहोचला कोरोना