23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeआणखी अडीच हजार रेल्वेगाड्या सोडणार

आणखी अडीच हजार रेल्वेगाड्या सोडणार

- रेल्वेची घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
येत्या दहा दिवसांत १९ राज्यांतील सुमारे ३६ लाख स्थलांतरित श्रमिकांना त्यांच्या १६ राज्यांमध्ये पोहोचविण्यासाठी २६०० प्रवासी रेल्वेगाड्या सोडण्याची योजना असल्याची माहिती रेल्वेचे मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार यांनी शनिवारी दिली. आतापर्यंत श्रमिक स्पेशल गाड्या तसेच, राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून ४५ लाख श्रमिकांना त्यांच्या गावी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वे आणि राज्य सरकारांनी आपापले नोडल अधिकारी नियुक्त करून श्रमिक स्पेशल गाड्या सोडण्यात आल्या. देशातील कोणत्याही रेल्वे स्थानकावरून गाड्या सोडण्याची रेल्वेची तयारी आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षित वावराचे नियम पाळले जात आहेत. २० मे रोजी ४ लाख प्रवाशांसाठी सर्वाधिक २७९ गाड्या सोडण्यात आल्या. १ मेपासून आतापर्यंत २६०० हून अधिक श्रमिक स्पेशल गाड्यांनी ३५ लाख श्रमिकांनी प्रवास केला असून, त्यात ८० टक्के प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आहेत.

आतापर्यंत उत्तर प्रदेशासाठी १२४६, बिहारसाठी ८०४ तसेच झारखंडसाठी १२४ गाड्या सोडण्यात आल्या आहेत. राज्य सरकारांशी समन्वय साधून आंतरराज्य ३६ लाख आणि राज्यांतर्गत दहा लाख श्रमिकांना घरी पोहोचविण्यात येईल. श्रमिकांना कमीत कमी वेळेत त्यांच्या गावी पोहोचविण्यात येईल. श्रमिक स्पेशल गाड्यांची आवश्यकता असेपर्यंत त्या चालवल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, आंतरराज्य बस वाहतुकीच्या माध्यमातून ४० लाखांहून अधिक श्रमिकांनी प्रवास केल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी दिली.

Read More  …तर मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल- संजय राऊत

येत्या एक जूनपासून दोनशे गाड्या सुरू होणार असून, त्यासाठी १७ लाख प्रवाशांनी तिकीट आरक्षित केल्याची माहिती विनोदकुमार यांनी दिली. देशातील विविध भागांमधील सहा हजार रेल्वे स्थानकांवर स्टॉल्स सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ आणि पेयजलाच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. रेल्वेने पाच हजार खाटांच्या १७ रुग्णालयांना कोरोना रुग्णालये म्हणून घोषित केले आहे. शिवाय, रेल्वेच्या ३३ रुग्णलयातील काही विभागांना कोरोनाच्या उपचारांसाठी बदलण्यात आले आहे. एक एप्रिल ते २२ मे दरम्यान रेल्वेने ९७ लाख टन खाद्यान्नाची वाहतूक केली आहे.

रेल्वे मार्गावरील कोंडीमुळे रेल्वे राऊरकेला येथे पोहोचली
मुंबईच्या वसईहून गोरखपूरकडे निघालेली श्रमिक स्पेशल गाडी मार्ग भरकटून ओडिशाच्या राऊरकेलामध्ये पोहोचल्यामुळे घरी पोहोचण्याच्या आशेने निघालेले श्रमिक अडकले. पण ही चूक झालेली नसून, उत्तर प्रदेशच्या रेल्वेमार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण झाल्यामुळे या गाडीचा मार्ग मुद्दाम बदलण्यात आला, अशी सबब विनोदकुमार यांनी दिली. सर्वाधिक म्हणजे ८० टक्के श्रमिक स्पेशल गाड्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सोडण्यात आल्यामुळे त्या रेल्वे मार्गांवर कोंडीही निर्माण झाली होती. एकाच दिशेने सर्व गााड्या जात असल्यामुळे या रेल्वे मार्गांवरील काही गाड्यांना आम्ही दुसºया रेल्वे मार्गांवर वळविले. हा लांबचा मार्ग असला, तरी निर्धारित मार्गावरून ही गाडी चालवली असती, तर विलंबाने पोहोचली असती. त्याऐवजी दुसºया मार्गाने ती लवकर पोहोचेल. हा परिपाठ आम्ही नेहमीच अंमलात आणतो, असे विनोदकुमार म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या