मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाला नवे मुख्य न्यायाधीश मिळाले आहेत. न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धानुका हे फक्त तीन दिवस मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील. मुंबई उच्च न्यायालयात सर्वोच्च पदावर असलेल्या न्यायाधीशांचा हा आतापर्यंतचा सर्वात लहान कार्यकाळ असेल. राजभवनात त्यांना शपथ देण्यात आली आहे. सध्या न्यायमूर्ती धानुका हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. २३ जानेवारी २०१२ रोजी त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. ३० मे रोजी ते ६२ वर्षांचे झाल्यावर निवृत्त होणार आहेत. अशा प्रकारे त्यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाचा कार्यकाळ केवळ तीन दिवसांचा असेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने १९ एप्रिल रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बढतीची शिफारस केली होती. ११ डिसेंबर २०२२ रोजी माजी सरन्यायाधीश दीपंकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यानंतर पाच महिन्यांहून अधिक काळ उच्च न्यायालय कायमस्वरूपी मुख्य न्यायमूर्तीविना होते. तत्कालीन ज्येष्ठ न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला यांची हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. केंद्र सरकारने शुक्रवारी न्यायमूर्ती रमेश धानुका यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी आणि न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करणाऱ्या दोन स्वतंत्र अधिसूचना जारी केल्या होत्या.