हायटेक लष्कर, भारतीय सैन्य अद्ययावत तंत्रसज्ज होणार
नवी दिल्ली : भारतीय लष्कर आता हायटेक होत आहे. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री खरेदी करण्याची प्रक्रिया संरक्षण मंत्रालयाने सुरू केली आहे. भारतीय सैन्याला अद्ययावत तंत्रसज्ज करण्यासाठी आवश्यक जेटपॅक सूट किंवा रोबो, ड्रोन यांच्या खरेदीसाठी निविदा जारी केल्या आहेत. यामध्ये जवानाला ताशी ५० किमीच्या वेगाने हवेत उडण्यासाठी ४८ जेटपॅक, अडीअडचणीच्या द-याखो-यातील ठिकाणी पोहोचण्यासाठी ४ पायांचे १०० रोबोटिक म्यूल आणि तब्बल १३० शस्त्रसज्ज ड्रोनचा समावेश आहे.
सैन्याला ही अत्याधुनिक यंत्रसामुग्री मिळाल्यानंतर भारतीय जवानांची मारक क्षमता आणखी वाढणार आहे. लष्कराने ही अद्ययावत यंत्र खरेदी करण्यासाठी फास्ट्रॅक खरेदी तंत्राचा अवलंब केला आहे. यामुळे नेहमीच्या शस्त्रास्त्र खरेदीत होणारी दिरंगाई टाळली जाणार आहे. लष्कराला या यंत्रसामुग्रीचा पुरवठा झाल्यानंतर भारतीय सैन्य हॉलीवूडच्या सिनेमातील हिरोप्रमाणेच सहसा अनाकलनीय वाटणा-या मोहिमा लीलया पार पाडू शकणार आहे.
४८ जेटपॅक, १०० रोबोटिक म्यूल आणि १३० ड्रोन या सामुग्रीची खरेदी फक्त फास्टट्रॅक होत नाही तर स्वदेशी उत्पादकाकडून केली जाणार आहे. भारतीय लष्कराला अपेक्षित जेटपॅक आधुनिक प्रॉपल्शन सिस्टीम तसेच सर्व दिशांना झेपावण्यासाठीची आवश्यक नेव्हीगेशनने सज्ज असतील.
आज सियाचीन ग्लेशियर किंवा त्यासारख्या दुर्गम ठिकाणी सामान्य सैनिकास तैनात करणे हे एक आव्हानच असते, अशा ठिकाणी अशी रोबोटिक यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्यामुळे भारतीय सैन्याची मोठी सोय होणार आहे. तसेच त्यांच्या लढण्याच्या क्षमतेतही मोठी वाढ होऊ शकते. आज जारी करण्यात आलेल्या या निविदांची मुदत १४ फेब्रुवारीपर्यंत आहे. म्हणजे उत्पादकांना १४ फेब्रुवारीपर्यंत आपले देकार संरक्षण मंत्रालयाला कळवायचे आहेत.
काश्मीरमध्ये असलेली एलओसी म्हणजे नियंत्रण रेषा किंवा भारत चीन यांच्यातील प्रत्यक्ष ताबा रेषा यावर अलीकडच्या काळातील हिंसक चकमकीत वाढ झाली आहे. अशा ठिकाणी अशी अद्ययावत तंत्रसामुग्री उपलब्ध झाल्यावर भारतीय सैन्यासाठी ही मोठी उपलब्धी असेल. सध्या जेटपॅक, ड्रोन किंवा रोबोटिक म्यूल्स अशी अद्ययावत तंत्रसामुग्रीची सज्जता फक्त अमेरिका आणि ब्रिटनच्या रॉयल मरीनकडेच असल्याचे सांगितले जाते.
ड्रोनद्वारे करता
येणार टेहेळणी
भारतीय लष्कर खरेदी करणार असलेल्या ड्रोनचा उपयोग दूरवरच्या टेहळणीसाठी होणार आहे, तर जेटपॅक परिधान करून भारतीय जवान संशयास्पद असलेल्या ठिकाणाचा हवेतून आढावा घेण्यासाठी सज्ज होणार आहेत.
जेटपॅकचा वेग ताशी ५० कि.मी.
जेटपॅकची क्षमता ताशी ५० किमीच्या वेगाने हवेत उडण्यासाठी पुरेशी असणार आहे. तसेच ४ पायांच्या रोबोटिक म्यूलच्या सहाय्याने जिथे सैनिकाला सहजासहजी अवजड दारुगोळा किंवा अन्य सामुग्री पोहोचवण्यात अडचणी येतात. तिथेही मनुष्यहानी न होता सामुग्री पोहोचवणे शक्य होणार आहे. तसेच हे रोबोटिक म्यूल समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट उंचीवरही काम करण्यास सक्षम असतील.