रत्नागिरी : वृत्तसंस्था
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सध्या सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत देखील आता वाढ होत आहे. मृत्यूदर कमी असला तरी कोरोनाला रोखायचे कसे? शिवाय, गाव-खेड्यांमध्ये देखील आता कोरोनाचा शिरकाव होत आहे. दरम्यान, कोरोनावर औषधोपचार उपलब्ध नसल्याने आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे. त्याच पार्श्वभूमिवर आता रत्नागिरी जिल्ह्याने मोठा निर्णय घेतला आहे.
होमिओपॅथी आर्सेनिकम अल्बम ३० जिल्ह्यातील साडेचार लाख घरामध्ये मोफत वाटणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. असे वाटप करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे़ आशा वर्करमार्फत गोळ्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे. केवळ रत्नागिरीच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अशा प्रकारचा निर्णय घेत गोळ्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या गोळ्यांचा खर्च हा कोविड फंडातून केला जाणार आहे.
Read More श्रीनगरमध्ये भारतीय सैनिक-दहशतवाद्यांमध्ये चकमक
जिल्हा आयुष विभागाचे म्हणणे काय?
रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता आर्सेनिकम अल्बम ३० या गोळ्या उपयुक्त आहेत. त्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती नक्की वाढेल. याचा फायदा कोरोनाच्या या लढ्यात होणार आहे. सर्व वयोगटातील व्यक्ती या गोळ्यांचे सेवन करू शकतात. शिवाय, कुणावर इतर कोणत्या रोगाचा इलाज सुरू असल्यास देखील या गोळ्या घेता येणार आहेत. रोज उपाशी पोटी तीन गोळ्या केवळ तीन दिवस घ्यावी लागतील. त्यानंतर महिनाभरानंतर पुन्हा या गोळ्या तीन दिवस घ्यायच्या आहेत. असे तीन महिने प्रत्येक व्यक्तिला या गोळ्या घ्याव्या लागणार आहेत. लहान वयोगटातील मुलांना देखील या गोळ्या दिल्यास कोणताही धोका नाही, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा आयुष विभागाचे प्रमुख आशफाक हाजी यांनी दिली आहे.
Read More बंधणे शिथील करण्याचे अधिकार राज्यांना नाहीत!
केव्हा होणार वाटप सुरू?
या गोळ्यांकरीता कोविड फंडमधून खर्च केला जाणार आहे. त्याकरता जिल्हाधिकारी लवकरच हा खर्च मंजूर करतील. पुढील २ ते ४ दिवसात याची सुरूवात होईल आणि जिल्ह्यातील प्रत्येक घरात या गोळ्या मोफत वाटल्या जातील, अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.