मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. अरविंद केजरीवाल मंगळवारी (२३ मे) संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, खासदार संजय सिंह आणि खासदार राघव चढ्ढा देखील मुंबईत दाखल होणार आहेत. केंद्र सरकारचा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी मोहीम राबवली आहे. त्यासंदर्भात अरविंद केजरीवाल विरोधी पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.
शरद पवार यांची भेट घेणार केजरीवाल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज भेट घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल संध्याकाळी मुंबईत दाखल होतील. मुंबई भेटीत अरविंद केजरीवाल बुधवारी (२४ मे) उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तर २५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. याआधी केंद्राच्या अध्यादेशासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची देखील केजरीवाल यांनी भेट घेतली होती.
दिल्लीमध्ये अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये राज्य सरकारलाही वाव देणारा आदेश सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने ११ मे रोजी दिला होता. पण केंद्र सरकारने अवघ्या आठ दिवसात अध्यादेश आणत हा निकालच रद्दबातल केला. दिल्ली हे पूर्ण राज्य नाही. त्यामुळे इथे केंद्रच सुप्रीम असले पाहिजे असे म्हणत या अध्यादेशात सगळे अधिकार पुन्हा उपराज्यपालांकडे दिले आहेत.