27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रअरविंद सावंत शिवसैनिकांसाठी दादर पोलिस ठाण्यात

अरविंद सावंत शिवसैनिकांसाठी दादर पोलिस ठाण्यात

एकमत ऑनलाईन

 सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई : गणपती विसर्जनावेळी प्रभादेवीत शिवसैनिक आणि शिंदे गटात झालेल्या राड्यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणात दादर पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते, तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक केली होती. याविरोधात शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये आली होती.

रविवारी सकाळपासून दादर पोलिस ठाण्यात शिवसेनेचे बडे नेते एकापाठोपाठ एक दाखल होताना दिसत आहेत. शिवसैनिकांवरील अटकेच्या कारवाईविरोधात जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत सर्वप्रथम दादर पोलिस ठाण्यात दाखल झाले.

अरविंद सावंत यांच्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, अनिल परब आणि अंबादास दानवे हे देखील पोलिस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात केलेल्या कारवाईचा तीव्र निषेध केला. पोलिसांनी शिवसैनिकांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांच्या तक्रारीवरून आमच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिस तक्रार दाखल करतात. मग आमच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून सदा सरवणकर यांना पोलिस अटक का करत नाहीत, असा सवाल अरविंद सावंत उपस्थित केला. पोलिसांनी याप्रकरणात आमचे म्हणणे ऐकून सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

मात्र, जोपर्यंत सदा सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलिस स्टेशनबाहेरून हटणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे सध्या दादर पोलिस ठाण्याबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा रंगला आहे. शिवसैनिक महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात पोलिसांना लेखी तक्रार दिली होती. पण पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही, असा आरोपही शिवसैनिकांकडून करण्यात आला.

दरम्यान, शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर शिंदे गटही सक्रिय झाले आहेत. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी तातडीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू स्पष्ट केली आहे. सत्ता गेल्यामुळे शिवसेना बिथरली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला.

शिवसैनिकांनी माझ्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन चोरली
शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे आणि शिवसैनिकांमध्ये शनिवारी मध्यरात्री पुन्हा वाद झाला होता. शिवसैनिक आपल्याला मारहाण करण्यासाठी आले होते, असे संतोष तेलवणे यांनी म्हटले. त्यावेळी शिवसैनिकांनी माझी दोन तोळ्याची चेन चोरली, अशी तक्रार तेलवणे यांनी दादर पोलिसांकडे दाखल केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या