25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रभाजपने प्रस्ताव धुडकावताच ‘वर्षा’ वर हालचाली

भाजपने प्रस्ताव धुडकावताच ‘वर्षा’ वर हालचाली

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ऍक्शन मोडमध्ये येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६ जूनला वर्षा बंगल्यावर अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांना पाठिंबा देण्याविषयी अपक्ष आमदारांना गळ घालतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता वर्षा बंगल्यावरील बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही. सहाव्या जागेवरून भाजपने धनंजय महाडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे. ही जागा जिंकण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडे साधारण ३० च्या आसपास मते आहेत. त्यामुळे उर्वरित १२ मते मिळवण्यासाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

शिवसेनेकडील पाच आमदार असे आहेत की ते एकतर छोट्या पक्षाचे असून सरकारमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे पाच मते नक्की मिळतील. तर भाजपकडे स्वत:चे १०६, रासप १, जनसुराज्य १ आणि पाच अपक्ष मिळून असे ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे उरलेल्या दहा अपक्षांची भूमिका महत्त्वाची असेल. ही मते ज्या उमेदवाराच्या पारड्यात पडतील, तो उमेदवार विजयी होईल.

या दहामध्ये बहुजन विकास आघाडीचे तीन तर याशिवाय संजय शिंदे, चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), नरेंद्र भोंडेकर, आशिष जयस्वाल, मंजुषा गावित आणि गीता जैन यांचा समावेश आहे. त्यामुळे आता ६ जून रोजी वर्षा बंगल्यावर होणा-या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सगळ्यांशी काय संवाद साधणार, हे पाहावे लागेल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या