मुंबई : आज सभागृहामध्ये शिंदे- फडणवीस सरकारची बहुमत चाचणी झाली. या चाचणीसाठी आमदारांचं मतदान सुरू असताना राष्ट्रवादी – काँग्रेसचे जवळपास १० ते १२ आमदार गैरहजर होते. यात अशोक चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश होता. यानंतर हे आमदार नाराज होते का? असा सवाल उपस्थित केला जात होता. यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, प्रथेप्रमाणे आधी चर्चा आणि नंतर मतदानाची प्रक्रिया होते. त्यामुळे आम्हाला यायला थोडा उशीर झाला. सभागृहाचे दरवाजे बंद झाल्यानंतर २-३ मिनिटातच आम्ही तिथे पोहोचलो होतो. आम्हाला तिथे यायला फक्त २-३ मिनिटच उशीर झाला होता. मात्र, बहुमत चाचणी आधीच सुरू झाल्याने आम्ही आत जाऊ शकलो नाही, असं ते म्हणाले.
बहुमत चाचणीवेळी गैरहजर असलेले आमदार महाविकास आघाडीवर नाराज होते का? असा सवाल केला असता अशोक चव्हाण म्हणाले, की यात काहीही राजकीय अर्थ नाही. बाहेर मी एकटा नव्हतो तर राष्ट्रवादी-काँग्रेसचे जवळपास १०-१२ आमदार होते. यामागे कोणतंही राजकीय कारणकिंवा नाराजी नाही. आम्ही आज आणि उद्याही महाविकास आघाडीसोबत आहोत. आम्ही कायम महाविकास आघाडीसोबत राहाणार आहोत, असं ते म्हणाले.
अशोक चव्हाण पुढे असंही म्हणाले, की आम्ही वेळेवर बहुमत चाचणीसाठी तिथे पोहोचलो नाही याचा फार फरक पडला नाही. भाजप-शिंदे यांच्याकडो १६४ मतं होती. त्यामुळे बहुमत त्यांच्याकडेच होतं.