अशी ही बनवाबनवी!

  413

  कोरोनाचे जागतिक संकट अभूतपूर्व आहे, शिवाय ते एकेरी नाही तर बहुपदरी आहे़ या संकटाने देशातील आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेचे, आरोग्य समस्येच्या आकलनाचे आणि अशा संकटाचा प्रतिकार करण्यासाठी यंत्रणेत उपलब्ध असणाºया क्षमतेचे अक्षरश: वाभाडे काढले आहेत़ खरे तर अशा संकटाचा सामना करताना आपल्या तोकड्या व उघड्या पडलेल्या क्षमतांचा प्रामाणिकपणे स्वीकार केला गेला तरच त्यात सुधारणांची प्रक्रिया सुरू होते़ मात्र, आपल्या देशात ज्यांच्या हाती सुधारणांची दोरी आहे त्यांना संकटापेक्षा व त्यावरील प्रामाणिक सुधारणांच्या प्रयत्नांपेक्षा संकटाने आपल्यावर जे राजकीय संकट ओढवले जाऊ शकते त्याचीच सर्वोच्च चिंता लागलेली असते.मग अशावेळी सत्तेत व विरोधात कोणताही राजकीय पक्ष असो, त्यांची आपापली सोयीस्कर भूमिका ठरलेली असतेच!

  सत्ताधा-यांनी आपणच काय ते जनतेचे तारणहार, असे ढोल बडवून जोरजोरात सांगायचे असते तर विरोधकांनी हे सगळे कसे गौडबंगाल आहे, निरर्थक आहे, हे ओरडून सांगायचे असते़ हा खेळ अगदी मन:पूर्वक रंगवला जातो व या खेळात मग अवघा देश, जनताही रंगून जाते़ मात्र, या खेळात मूळ मुद्दा व त्यावर प्रामाणिकपणे करायच्या सुधारणा, प्रयत्न हे सपशेल बाजूला पडतात़ सध्या आपल्या देशात नेमका हाच खेळ रंगात आला आहे़ कोरोना महामारीच्या संकटाने देशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या क्षमता उघड्या पडल्या़ हे खरे तर कुठल्या एका पक्षाच्या सरकारचे अपयश नाही कारण देश स्वतंत्र झाल्यापासून ज्यांनी-ज्यांनी हा देश सत्ताधारी म्हणून हाकला त्यांचा देशातील सार्वजनिक आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, राबवली गेलेली धोरणे व वेळोवेळी याबाबत गंभीर इशारे मिळूनही त्याकडे करण्यात आलेले दुर्लक्ष याचा हा एकत्रित परिणाम आहे़ मग कोरोनासारख्या अभूतपूर्व महासंकटात तरी किमान झालेल्या चुकांचा, प्रामाणिक कबुली व या चुका सुधारण्याचे प्रामाणिक प्रयत्न दिसायला हवेत की नको? मात्र, देशात सध्या काय दिसते आहे, तर हा मूळ मुद्दा सोडून इतर बाबींवर म्हणजे ‘साईड इफेक्टस्’वर जोरदार चर्चा, वाक्युद्ध, दावे-प्रतिदावे वगैरे होतायत पण कोणीच मूळ दुखणे बरे करण्याबद्दल ‘ब्र’ शब्दही काढत नाही.

  Read More  1,206 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण

  जे सध्या सत्तेत आहेत ते ‘आलिया भोगासी’ म्हणत स्वत:च्या नशिबावर चडफडत या संकटावर ‘बनवाबनवी’चे बँडेज बांधण्यात गर्क आहेत तर ‘बरे सापडले’ म्हणून मनातून आनंदून जात बांधलेले बँडेज फाडून टाकण्यात विरोधक मश्गूल आहेत़ यात ती भळभळती जखम तशीच भळभळत पडलीय व ज्या सर्वसामान्याला ही जखम झालीय तो बिचारा निमूटपणे असह्य वेदना सहन करतोय, रंगलेल्या व रंगवल्या जाणाºया खेळाकडे असहाय्यपणे बघतोय! मूळ दुखणे निर्माण झाले ते सार्वजनिक आरोग्य म्हणजे ‘फुकटचे ओझे’ या सरकारी दृष्टिकोनातून कारण सार्वजनिक आरोग्य द्यायचे तर त्यावर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागतो आणि त्यातून ‘रिटर्न’ म्हणून कुठलाही राजकीय फायदा मिळत नाही, हीच भारतीय राजकीय क्षेत्रात वावरणा-यांची धारणा! शिवाय देशाच्या अफाट लोकसंख्येमुळे व त्यातही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांची संख्या अफाट असल्याने दर्जेदार सार्वजनिक आरोग्यासाठी करावे तेवढे कमीच आणि त्या तुलनेत मिळणारा ‘इन्स्टंट’ राजकीय लाभ नगण्यच! मग हे फुकटचे ओझे सांभाळत बसण्यापेक्षा खाजगी वैद्यकीय सुविधा क्षेत्रांना आशीर्वाद दिला तर एका दगडात अनेक पक्षी मरतात! अशा या धोरणामुळे देशाने स्वातंत्र्यापासून आजवर देशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसाठी कधी गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत की, भरीव आर्थिक तरतूद करून ती यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न केले नाहीत़ त्यामुळे या क्षेत्राची व यंत्रणेची अवस्था एवढी बकाल बनली की, या यंत्रणेत सुरुवातीची काही वर्षे सेवा देणे देशातील डॉक्टरांना कायद्याने बंधनकारक करणे देशाला भाग पडले आहे.

  Read More  केंद्रीय अर्थमंत्र्यांची आज शेवटची पत्रकार परिषद, वाचा आजच्या महत्वाच्या घोषणा !

  या स्थितीला व अनास्थेला देशात आजवर राबविले गेलेले धोरण कारणीभूत आहे़ हे अपयश झाकण्यासाठी, सत्य लपवण्यासाठी मग खाजगी वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीचा, विकासाचा, दर्जाचा ढोल सरकारी पातळीवरूनही पिटला जातो व त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होतो़ देशातील खाजगी वैद्यकीय सेवा चांगल्या प्रमाणात विकसित झाली आहे, दर्जेदार आहे व जगातील इतर संपन्न व विकसित देशांच्या तुलनेत ती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे, हा दावा सत्य व मान्यही! मात्र, ही खाजगी वैद्यकीय सेवा देशातील किती लोकांना परवडते? घेता येते? याची संख्या सांगण्याचे अथवा मांडण्याचे कष्ट मात्र कोणीही घेत नाही़ जेव्हा देशावर सार्वत्रिक संकट कोसळते तेव्हा ही दर्जेदार, पंचतारांकित खाजगी वैद्यकीय सेवा काय करते? कितपत उपयोगी पडते? कोणती भूमिका घेते? या सगळ्या प्रश्नांची खरीखरी उत्तरे आता कोरोना महामारीच्या देशावरील संकटाने प्राप्त झाली आहेत़ देशातील खाजगी वैद्यकीय क्षेत्राने या संकटाच्या काळात अशी भूमिका घेतलीय की, सरकारलाच आता ‘रुग्णांना सेवा द्या, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू’, असा बडगा उगारण्याची वेळ आली आहे! मग आजवर या क्षेत्राला सरकारने जे प्रोत्साहन दिले, सवलती दिल्या, त्यांच्या कौशल्याचे व दर्जाचे जे ढोल पिटले त्याचा फायदा काय? कोरोनाच्या संकटाचा सगळा भार तर विपन्नावस्थेत असणा-या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेलाच उचलावा लागतो आहे़ स्वत:च विपन्नावस्थेत असणारी ही यंत्रणा हा भार कसा पेलणार? कोरोनाविरुद्धच्या लढाईत विजय कसा मिळवणार? कोरोनाच्या संकटातून देशाला विविध पातळींवर जे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे ते नाकारता येणार नाही व या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारला पुढाकार घ्यावा लागणार, हे ही मान्यच!

  Read More  धक्कादायक …उदगीर शहरात आज १० नवीन  रुग्ण

  त्यामुळे मोदी सरकारने जी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करून त्याची टप्प्याटप्प्याने माहिती देण्यास सुरुवात केली आहे, त्याचे स्वागतच! या घोषणा व तरतुदी प्रत्यक्षात पदरात काय टाकणार? याची चिकित्सा, विश्लेषण होणे अपरिहार्यच आणि स्वाभाविकच! ती पॅकेजची सर्व सविस्तर माहिती येईल तशी आपण करूही! मात्र, ज्या कोरोनाच्या आरोग्य संकटाने या सगळ्याची सुरुवात झालीय त्या आरोग्य क्षेत्रातील समस्या व त्यावरील सुधारणा, त्यासाठीच्या उपाययोजना यापासून या पॅकेजची सुरुवात होणे, श्री गणेशा होणे गरजेचे व अपेक्षित असताना त्यावर या पॅकेजमध्ये अत्यंत सोयीस्कररीत्या मौनच बाळगण्यात आलेय असे नाही तर त्याला पद्धतशीर बगल देण्यात आली आहे़ गंमत म्हणजे पॅकेजवर विरोधक व सत्ताधारी यांच्याकडून जोरदार वाक्युद्ध झडत असताना, देशभर चर्चा रंगविल्या जात असताना कोरोना आरोग्य संकट आहे व त्याला पराभूत करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणे, त्यातील धोरणात्मक चुका दूर करणे गरजेचे आहे़, सरकारी दृष्टिकोन सुधारून जनतेचा आरोग्याचा मूलभूत हक्क मान्य करणे गरजेचे आहे़, भविष्यात अशा संकटाचा सामना करण्यासाठी, लोकांचा अशा संकटापासून बचाव करण्यासाठी सक्षम सार्वजनिक आरोग्य यंत्रणा उभारणे गरजेचे आहे, या मूलभूत मुद्यावर उपाययोजना होणे व तसा आग्रह धरला जाणे तर लांबच पण त्याचा साधा उल्लेखही होत नाही, कोणी करत नाही आणि कुणाला त्याचे स्मरणही रहात नाही़ ‘साईड इफेक्टस्’नाच मूळ रोग समजून उपाययोजनांच्या घोषणा होत आहेत आणि मूळ रोग तसाच उपचाराविना दुर्लक्षित आहे! यावरून सरकार, विरोधक यांचा कोरोना संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, भूमिका स्पष्ट होते! यालाच म्हणतात, ‘अशी ही बनवाबनवी’! इतर अनेक घटनांमध्ये ती सर्रास जनतेच्या नशिबी येते, कोरोना संकटही त्याला अपवाद ठरले नाही, हे मात्र निश्चित!