नवी दिल्ली : विरोधकांचं कामच असतं टीका करणं. त्यांच्या असंवेदनशीलतेमुळेच ही परिस्थिती आली आहे. आम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतोय. संजय राऊतांना आता तरी समज आली पाहिजे. त्यांनी पक्षाची काय अवस्था करून टाकलीय. तुम्ही मला कशाला त्यांच्याबद्दल विचारता? सेन्सिबल माणसाबद्दल विचारा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आले आहेत.
यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. फडणवीस यांचा हा दिल्लीतील गेल्या पंधरा दिवसांतील तिसरा दौरा आहे. या दौ-यात फडणवीस भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर या दौ-यात चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या या दिल्ली दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२४ दिवसांत ८९ शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकारला अपयश आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार केला जात नाही. त्यामुळे जनतेची आणि शेतक-यांची अनेक कामे रखडली आहेत. त्याबाबत फडणवीस यांना विचारण्यात आले असता विरोधकांचे काम आहे टीका करणे. त्यांच्या असंवेदनशीलतेमुळे ही परिस्थिती आली आहे, असे फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच निर्णय होईल, काळजी करू नका, असेही ते म्हणाले.