औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात एक मोठे नाव असलेले आणि सध्या केंद्रात रेल्वे राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
तर त्या आपल्या पती हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. विशेष म्हणजे कन्नड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीची त्यांनी तयारी सुरू केल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील कौटुंबिक वाद जगजाहीर आहे.
त्यामुळे दानवे आपल्या कन्येला कन्नड मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र अशात कन्नड-सोयगाव मतदारसंघात संजना जाधव यांच्याकडून स्वत:ची कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून त्या विविध सामाजिक उपक्रम, जत्रा, लग्न समारंभ यांना आवर्जून हजेरी लावताना दिसून येत आहेत. तर कन्नडमध्ये त्यांना मानणारा वर्गही मोठा असल्याने त्यांच्या भेटीगाठींची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.