पुणे : प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून हत्या केल्याची पुण्यातील वाघोली भागातील घटना ताजी असतानाच, मुंबईच्या धारावी परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारावीत प्रियकरानेच प्रेयसीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तरुणी ६० ते ७० टक्के भाजली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न तिच्या लिव्ह-इन-पार्टनरने केला आहे. यात तरुणी गंभीररीत्या भाजली असून तिला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण धारावी हादरून गेली आहे.
या प्रकरणी ४१ वर्षीय आरोपी नंदकिशोर पटेल याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी १६ वर्षीय मुलाला देखील ताब्यात घेतले आहे.