नवी दिल्ली : डब्ल्यूएफआय अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर कुस्तीपटू आंदोलन करीत आहेत. येथे गेल्या १२ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. आता सुप्रीम कोर्टानेही यासंबंधीच्या याचिका निकाली काढून यापेक्षा वेगळी मागणी असेल, तर हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, दिल्लीत पाऊस झाल्याने जंतरमंतरवरील आंदोलकांचे अंथरुण ओले झाले. त्यांना पलंग उपलब्ध करून देत असताना पोलिस आणि आंदोलक, राजकीय नेत्यांत झटापट झाली. यादरम्यान कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी मारहाण केली. दरम्यान, कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलनही चिरडले. त्यामुळे आंदोलक कुस्तीपटूंमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जंतरमंतर येथे बुधवारी रात्री उशिरा झालेल्या संघर्षात कुस्तीपटू राकेश यादव आणि विनेश फोगाटचा भाऊ दुष्यंत जखमी झाला. एवढे होऊनही दिल्ली पोलिस कुस्तीपटूला दुखापत झाली नसल्याचे सांगत आहेत. त्यावरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, कुस्तीपटूंना भेटण्यासाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल, शेतकरी आणि खाप नेते पोहोचले. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नवज्योतसिंग सिद्धू आणि बॉक्सर विजेंदर सिंग यांनी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे.
बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास पावसामुळे आंदोलकांचे अंथरुन व रस्ते ओले झाले. त्यावेळी आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती आणि कुस्तीपटू पलंग घेऊन येत होते. त्यावेळी पोलिसांनी पैलवान व भारती यांना रोखले असता वादाला सुरुवात झाली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण पैलवान संतापले. किरकोळ झटापट झाली. भारती यांच्यासह अनेकांना ताब्यात घेण्यात आले. पैलवानांनी सांगितले की, आम्ही केवळ पलंग घेऊन जात होतो. पोलिसांनी अचानक आमच्यावर हल्ला केला. अनेक पोलिस मद्यधुंद स्थितीत होते. त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. कुस्तीपटूंनी एका पोलिसालाही पकडले. तो नशेत गैरवर्तन करत असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, बजरंग पुनिया म्हणाला की, या आपल्या देशाच्या माता-भगिनी आहेत. सर्वांनी जंतरमंतरवर पोहोचावे अन्यथा येथे कुणीही वाचणार नाही. त्यानंतर त्याने पोलिस दिसेल त्याला ताब्यात घेत असल्याचे नमूद करत आंदोलनस्थळी न येण्याचे आवाहन केले. आम्हाला मुद्यापासून भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे,असा आरोप त्याने केला. यावर प्रियंका गांधी, अरविंद केजरीवाल यांनी समर्थनार्थ विधाने केली. प्रियंका गांधी यांनी महिला कुस्तीपटूंचे अश्रू पाहून वाईट वाटले. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे म्हटले. या घटनेमुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सर्व पदके परत करणार
सलग १२ दिवसांपासून आंदोलन करणा-या कुस्तीपटूंनी गुरुवारी सांगितले की, ते सर्व पदके भारत सरकारला परत करणार आहेत. महावीर फोगाट यांनीही त्यांचा द्रोणाचार्य पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.
हा दिवस पाहण्यासाठी आम्ही पदक जिंकले का?
वादानंतर कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेतली. कुस्तीपटू संगीता फोगाट व साक्षी मलिकला अश्रू अनावर झाले. यावेळी विनेशने सांगितले की, ती बेड घेण्यासाठी जात होती. तेव्हा पोलिस कर्मचा-याने तिच्याशी गैरवर्तन केले. विनेश रडत म्हणाली की, हा दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी पदक जिंकले का? बृजभूषण शांतपणे झोपले आहेत. येथे आमच्यावर लाठीमार सुरू आहे.