राज्यातील पहिला प्रयोग
औरंगाबाद :‘माझे आरोग्य माझ्या हाती’ हे घोषवाक्य घेऊन महापालिकेने कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर मोबाईल अॅप तयार केले आहे. या अॅपचे शनिवारी लाँचिंग करण्यात आले. हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्यात स्वत:च्या आरोग्याबद्दलची माहिती भरल्यास ती व्यक्ती कोरोना संशयित आहे की नाही, याची पडताळणी पाच मिनिटांत होते. राज्यात अशा प्रकारचे हे पहिलेच अॅप संभाजीनगरात तयार करण्यात आल्याचा दावा देखील केला जात आहे.
श्रेयस इंजिनीअरिंग कॉलेजचे प्रा. नागेश डोंगरे यांच्या मदतीने महापालिकेने हे अॅप तयार केले आहे. त्यासाठी मनपाचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला. अॅपच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासोबत मनपा आयुक्त, प्रा. नागेश डोंगरे, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, समन्वयक अण्णासाहेब शिंदे, क्षेत्रीय अधिकारी सखाराम पानझडे यांच्या बैठका झाल्या. अॅपची वैधता तपासल्यानंतर त्याला मूर्त स्वरूप देण्यात आले.
अॅपबद्दल माहिती देताना प्रा. नागेश डोंगरे म्हणाले, हे स्क्रीनिंग अॅप आहे. या अॅपमध्ये आपण आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी, सर्दी, खोकला, ताप, रक्तदाब, मधुमेह, किडनी विकार याबद्दलची माहिती भरल्यावर या माहितीच्या आधारे काही मिनिटांत तुमचा झोन ठरविला जातो. ग्रीन झोन (सुरक्षित झोन), ऑरेंज झोन (अंडर ऑब्झर्वेशन) आणि रेड झोन (बाधित) असे तीन झोन तयार करण्यात आले आहेत. सर्दी, खोकला, ताप आल्यावर ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे, हे लक्षात येण्यासाठी सध्या सहा ते सात दिवस लागतात. या अॅपमुळे तीन दिवसांत निदान करता येणे शक्य आहे.
Read More मुरूम व शिराढोण येथे कोरोना रुग्ण आढळले
चाचणीसाठी दोन भाग
चाचणी घेण्याच्या दृष्टीने सेल्फ टेस्ट आणि कोरोना वॉरियर्स असे दोन भाग करण्यात आले आहेत. सेल्फ टेस्टमध्ये आपण आपली माहिती अॅपवर भरू शकतो. कंटेनमेंट भागांमध्ये कोरोना वॉरियर्सच्या माध्यमातून या अॅपच्या साह्याने माहिती भरून घेतली जाणार आहे. स्वत:ची माहिती स्वत: भरण्यासाठी ऑस्किमीटर असणे गरजेचे आहे. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण 92 टक्के किंवा त्यापुढे असणे गरजेचे आहे. त्यापेक्षा कमी प्रमाण असेल तर त्या व्यक्तीला उपचाराची गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे, असेही प्रा. नागेश डोंगरे यांनी सांगितले.
महापालिकेत संकलित होणार डेटा
अॅपच्या माध्यमातून ज्या व्यक्ती माहिती भरतील आणि आपली नोंदणी करतील, त्यांचा डेटा लगेचच महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या वॉररूममध्ये जमा होणार आहे. अॅप वापरणाऱ्यांच्या आरोग्याबद्दलची सगळी माहिती महापालिकेकडे संकलित स्वरूपात राहणार आहे. माहितीच्या आधारे एखाद्या व्यक्तीला आरोग्यसेवेची गरज आहे, असे लक्षात आले तर लगेच त्याला ती सेवा पुरविली जाईल, असे आयुक्त पाण्डेय यांनी स्पष्ट केले.