नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु आहे. पहिल्या दिवशीचा खेळ संपला, तेव्हा दिवसअखेर भारताची स्थिती २१ धावांवर शून्य बाद अशी होती. भारत २४२ धावांनी पिछाडीवर असून कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल क्रिजवर आहेत.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. त्यानंतर त्यांचा पहिला डाव २६३ धावांवर आटोपला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक ८१ तर हॅन्ड्सकॉम्बने नाबाद ७२ धावांची खेळी केली, तर भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ आणि अश्विन-जडेजा जोडीने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारताने दिवसअखेर २१ धावा केल्या असून एकही विकेट गमावलेली नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचा एक मोठी धावसंख्या करण्याचा डाव होता. मात्र, त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि शेवटच्या षटकांत पीटर हॅन्ड्सकॉम्ब यांनी दमदार फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून सामन्यात काही चांगल्या पार्टनरशिप्स पाहायला मिळाल्या. सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने ८१ धावा, तसेच पॅट कमिन्सने ३३ धावा केल्या. सर्वात उत्तम म्हणजे पीटर हॅन्ड्सकॉम्बने नाबाद ७२ धावांची खेळी करत धावसंख्या किमान २५० च्या पुढे नेली. भारताकडून मोहम्मद शमीने १४.४ षटकांत ६० धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतले, तर अश्विन आणि जडेजा यांनी प्रत्येकी २१ षटके टाकत अनुक्रमे ५७ आणि ६८ धावा देत प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियन संघात
४ फिरकीपटूंचा समावेश
दिल्लीत खेळल्या जात असलेल्या भारताविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात ४ फिरकीपटूंचा समावेश केला आहे. प्लेईंग इलेव्हनकडे पाहता कांगारू संघात नॅथन लियॉन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनमन हे फिरकीपटू म्हणून खेळत आहेत. त्याचबरोबर ट्रॅव्हिस हेड हादेखील अष्टपैलू फिरकी गोलंदाज आहे. या फिरकीपटूंशिवाय दुस-या कसोटीत कांगारू संघात वेगवान गोलंदाज म्हणून फक्त पॅट कमिन्स आहे.