नवी दिल्ली : समाजातील गरीब, मागासवर्गीय आणि अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिकरीत्या सक्षम करण्यासाठी केंद्रीय विश्वविद्यालय पुढाकार घेणार आहेत. विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.
या केंद्राचे व्यवस्थापन केंद्रीय विश्वविद्यालयाकडून चालवण्यात येणा-या डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलेंसकडून करण्यात येणार आहे. ही योजना केंद्राच्या सामाजिक कल्याण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे समाजातील मागास आणि गरीब विद्यार्थ्यांना यूपीएससीचा मोफत अभ्यास करता येणार आहे.
दरम्यान या प्रशिक्षण केंद्रामध्ये केंद्रीय विश्वविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक देण्यात येणार आहेत. देशभरातील तब्बल ३० विश्वविद्यालयांत ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्राच्या प्रशासकीय सेवेमध्ये जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा समावेश व्हावा यासाठी केंद्रीय सामाजिक कल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे. आंबेडकर फाऊंडेशनने यासाठी सर्व तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात सर्व राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात कमीत कमी एका विश्वविद्यालयात हे केंद्र सुरू केले जाणार असल्याचे सांगितले आहे.
परंतु हे केंद्र सुरू करण्यापूर्वी विश्वविद्यालयांना डॉ. आंबेडकर एक्सलेंस सेंटर सुरू करावे लागणार आहे. कारण विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर एक्सलेंस सेंटरकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विश्वविद्यालयांना या केंद्रासाठी एक सहाय्यक आणि वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक द्यावे लागणार आहेत.
गरज पडली तर प्रशिक्षणासाठी बाहेरील शिक्षकांची मदत घेता येऊ शकते असे मंत्रालयाने सांगितले आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार विश्वविद्यालयांना वार्षिक ७५ लाखांचा निधी देणार आहे. यासाठी विश्वविद्यालयांना कमीत कमी १०० मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांमध्ये ३३ टक्के महिला उमेदवार असायला हव्यात अशी अट केंद्राने घातली आहे.