मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेले बागेश्वर धामचे स्वयंघोषित चमत्कारी धर्मगुरु धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा कार्यक्रम आज मीरा-भाईंदरमध्ये सुरु झाला. अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडून विरोध होत असतानाही आज मीरा रोड परिसरात हा कार्यक्रम पार पडत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या कार्यक्रमाला परवानगी न देण्याची मागणी केली आहे. यादरम्यान, धीरेंद्र कृष्ण शास्त्री आज पहाटे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यावेळी विमानतळावर उपस्थित शेकडो भक्तांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं जोरदार स्वागत केलं.
यांचा दरबार शनिवारी आणि रविवारी मीरारोड येथे भरणार आहे. मात्र, बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि काँग्रेस पक्षाकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला ५० हजार ते एक लाख लोक जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे मीरारोडमध्ये आज संध्याकाळी बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात हायव्होल्टेज ड्रामा रंगण्याची शक्यता आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमात बागेश्वर बाबाने केलेल्या एका वक्तव्यामुळे अंनिसने त्यांचा विरोध सुरु केला होता.
नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिव्य दरबारात बागेश्वर बाबाने आपण दिव्यशक्तीने समोरच्या मनातील गोष्ट जाणून घेऊ शकतो, असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्याला अंनिसच्या श्याम मानव यांनी आव्हान दिले होते. त्यांच्या या आव्हानानंतर बागेश्वर बाबाने महाराष्ट्रातून काढता पाय घेतल्याचे बोलले गेले. चमत्कार करुन दाखवला तर ३० लाख रुपयांचं बक्षीस देऊ, असं श्याम मानव म्हणाले होते.
छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर दाम हनुमान मंदिरात रोज हजारो भाविक येत असतात. यात पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे कथावाचक आहेत. बागेश्वर बाबांचा जन्म बागेश्ववर गढा या गावात झाला होता. बागेश्वर बाबांच्या गावात हनुमानाचं मंदिर आहे.
याच बालाजी मंदिरात त्यांचे आजोबा भगवानदास गर्ग यांची समाधी आहे. आजोबा सिद्धपुरुष होते आणि त्यांच्या तपश्चर्येमुळं आपल्याला भविष्य सांगण्याची सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा ते करतात. तसंच, त्यांनी असाही दावा केला आहे की, त्यांच्याकडे असलेल्या दैवीशक्तीमुळं ते लोकांच्या मनातील गोष्ट ओळखू शकतात. त्यांच्या याच दाव्यामुळं बागेश्वर धाममध्ये भक्तांची संख्या वाढली आहे, असंही ते म्हणतात.