26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeमहाराष्ट्रराऊतांना जामीन; मातेला अश्रू अनावर

राऊतांना जामीन; मातेला अश्रू अनावर

एकमत ऑनलाईन

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाने अखेर जामीन मंजूर केला. हा निर्णय समजताच राऊत कुटुंबात आनंदाची लकेर पसरली. संजय राऊत यांच्या मातोश्रींनी राहत्या घराच्या खिडकीतून राऊत समर्थकांसमोर आनंद व्यक्त केला. यावेळी सविता राऊत यांना अश्रू अनावर झाले. खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया सविता राऊत यांनी दिली.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अखेर विशेष पीएमएलए कोर्टाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. गोरेगावमधील पत्राचाळ (सिद्धार्थ नगर) पुनर्विकास प्रकल्पात प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित घोटाळ्यात सहभाग घेतल्याचा संजय राऊत यांच्यावर आरोप होता. याच प्रकरणात ईडीने अटकेची कारवाई केल्याने मागील १०२ दिवसांपासून ते तुरुंगात होते. मात्र अखेर आज कोर्टाने जामीन मंजूर केल्याने राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राऊतांच्या घरी दसरा-दिवाळी
संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकेर पक्षात जणू सण साजरा होत आहे. शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ निवासस्थानी डीजे मागवण्यात आला आहे. डीजेच्या तालावर संजय राऊत यांचे स्वागत केले जाणार आहे. बंगल्यातले कंदिलही पुन्हा एकदा नव्या तेजाने झळाळताना दिसत आहेत. म्हणजे मैत्री बंगल्यावर दसरा-दिवाळीच साजरी होताना दिसत आहे.

‘मातोश्री’वरुन फोन
राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांचे अभिनंदन करण्यासाठी फोन केला. त्यावेळी राऊत कोठडीत असल्यामुळे त्यांच्याशी थेट बोलणं झालं नाही, मात्र ठाकरेंनी आपल्या सदिच्छा संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचवल्या. ‘संजयचं अभिनंदन कर, लवकरच त्याला भेटीन’ असा निरोप उद्धव ठाकरेंनी दिला. त्यावर संजय राऊतांनीही धन्यवाद अशी प्रतिक्रिया नंतर दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या