मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये राजकीय उलथापालथ सुरूच आहे. शिवसेनेतील वर्चस्वाच्या लढाईनंतर, राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार पायउतार होणार हे निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत ३० वर्षांपूर्वी १९९२ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी जो डाव खेळला होता, तोच डाव उद्धव ठाकरेंनी खेळला आहे. आता उद्धव ठाकरे हे संकट टाळतील का? याकडे महारा]ष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात पक्षाच्या अनेक आमदारांनी बंडाचा बिगुल फुंकला. शिंदे आणि इतर बंडखोर आमदार सुरतहून आसाममधील गुवाहाटीला रवाना झाले. शिंदेंनी आपल्या बाजूने ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
या बंडामुळे सरकार अडचणीत असल्याचे पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या भाषणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधत शिवसेनेतील बंडखोरांना भावनिक आवाहन केले. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेन तर काय करायचे? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्यासमोर येऊन सांगायचे, तुम्ही मुख्यमंत्रिपदी नको. मी राजीनामा देण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
१९९२ मध्येही त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी अशीच कणखर वृत्ती दाखवली होती. ३० वर्षांपूर्वी १९९२ साली आपण शिवसेना सोडत असल्याचे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते. ज्या पक्षाला बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवले, पक्षात प्राण फुंकला तोच पक्ष सोडण्यासाठी बाळासाहेब ठाकरे तयार झाले होते. हा सर्व किस्सा १९९२ सालच्या सामनामधील एका लेखात देण्यात आला. त्यावेळी शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते माधव देशपांडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच उद्धव आणि राज ठाकरे हे पक्षाच्या कारभारात खूप हस्तक्षेप करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. या आरोपांनी बाळासाहेब ठाकरे हे दुखावले गेले होते. त्यानंतर त्यांनी सामनामधून मी आणि माझे कुटुंब शिवसेनेतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले.
मात्र, बाळासाहेबांच्या या भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये गोंधळ उडाला होता. शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. तेव्हा बाळासाहेबांनी शिवसैनिकांना शांत करत म्हटले होते की, मला एका तरी शिवसैनिकाने सांगावे की मी तुमच्यामुळे पक्ष सोडला. त्यानंतर मी पक्षप्रमुख पदाचा त्याग करेल. माझे कुटुंब देखील शिवसेनेमध्ये राहणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. लवकरच हे प्रकरण मिटले.
आता उद्धव ठाकरेही त्याच पावलावर पाऊल टाकताना दिसत आहेत. मात्र, १९९२ सालचा बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव ठाकरे यांचा काळ यात खूप फरक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेचा नेमका काय परिणाम होईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.