म्युनिच : युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाला आर्थिकदृष्ट्या एकटे पाडण्यासाठी अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी आज आणखी एक निर्णय घेताना रशियाकडून सोन्याची आयात न करण्याचे ठरविले असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सांगितले.
जर्मनीमध्ये आजपासून सुरु होणा-या जी-७ देशांच्या बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. बैठकीत युक्रेन युद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेल्या महागाई, अन्नधान्य टंचाई, युरोपमध्ये इंधनाचा तुटवडा अशा समस्यांवर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. तसेच, रशियाविरोधात जागतिक आघाडी उघडण्याबाबतही चर्चा होणार आहे.
ऊर्जेच्या निर्यातीत रशिया आघाडीवर आहे. बहुसंख्य युरोपीय देशांनी रशियाच्या इंधनावरील अवलंबित्व टप्प्याटप्प्यांमध्ये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियातून होणा-या निर्यातीत ऊर्जेनंतर सोन्याची निर्यात होते. आता सोने आयातीवर युरोपीय देशांनी बंदी घातल्यास रशियाची आणखी कोंडी होईल.