22 C
Latur
Wednesday, February 8, 2023
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचा-यांची बँक व पीएफ ट्रस्ट अडचणीत

एसटी कर्मचा-यांची बँक व पीएफ ट्रस्ट अडचणीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : एसटी कर्मचा-यांनी केलेल्या ऐतिहासिक संपानंतर एसटी महामंडळाची आर्थिक घडी विस्कटली असल्याचा दावा करण्यात येत असताना दुसरीकडे एसटी कर्मचा-यांची बँक आणि पीएफ ट्रस्ट अडचणीत आली असल्याचा दावा एसटी कामगार नेते श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

एसटी कर्मचा-यांच्या संप काळात कर्मचा-यांच्या वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण गेले पाच महिने ही रक्कम सरकारकडून अपुरी येत असून एसटी बँक तसेच भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही ट्रस्टकडे त्यांचा हिस्सा भरण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या रकमेवरील व्याज बुडत असून या संस्था अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांना कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत असल्याने या संस्था अडचणीत आल्याचा दावा महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

एसटी कर्मचारी सभासद असलेली स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑफ बँक असून तिचे ८७ हजार कर्मचारी सभासद आहेत. या बँकेची सभासदांनी घेतलेल्या कर्जवसुलीची १२० कोटी रुपये इतकी रक्कम एसटी महामंडळाने बँकेकडे भरणा केलेली नाही. बँकेने मात्र ही रक्कम कर्जदार डिफॉल्टर होऊ नयेत म्हणून कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा केली आहे.

त्याचा फटका बँकेला बसत असून हीच रक्कम बँकेने व्याजाने गुंतवली असती तर त्यावर अंदाजे सव्वा कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळाले असते. पण, त्याचा फटका बँकेला बसला असल्याने बँक अडचणीत सापडली आहे. या प्रकाराबद्दल रिझर्व्ह बँकेने सुद्धा वारंवार आक्षेप नोंदवला आहे. बँक तांत्रिकदृष्ट्या अडचणीत सापडली असल्याचा दावा बरगे यांनी केला आहे.

याशिवाय भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही रकमांचा एसटी कर्मचा-यांचा स्वतंत्र ट्रस्ट आहे. यासाठी कर्मचा-यांच्या वेतनातून कपात केलेल्या रकमेचा हिस्सा या ट्रस्टकडे भरणा केला जातो. तो हिस्सा सुद्धा गेले पाच महिने भरण्यात आलेला नाही. ही रक्कम अंदाजे ६५० कोटी रुपये इतकी आहे. ही रक्कम ट्रस्टकडे भरणा न झाल्याने गुंतवणुकीनंतर त्यावर मिळणारे अंदाजे १२ ते १५ कोटी रुपये इतके व्याज ट्रस्टला मिळालेले नाही. त्यामुळे या दोन्ही ट्रस्ट सुद्धा अडचणीत सापडल्या असून या संस्था सुद्धा गोत्यात आल्या आहेत. एसटी बँक व दोन्ही ट्रस्ट या संस्था कर्मचा-यांच्या असून त्या अडचणीत सापडल्याने कर्मचा-यांचे सुद्धा नुकसान होत असल्याकडे कामगार नेते बरगे यांनी लक्ष वेधले.

नव्या सरकारने वा-यावर सोडले
याव्यतिरिक्त एसटी कर्मचा-यांच्या सहकारी पतसंस्था, ग्राहक भांडार या संस्थांसुद्धा अनेक जिल्ह्यांत असून त्यांचेही कोट्यवधी रुपयांचे देणे बाकी आहे. त्यामुळे या संस्था सुद्धा अडचणीत सापडल्या असल्याचा दावा करण्यात येत आहे. महाआघाडीच्या काळात वेतनाची पूर्ण रक्कम सरकारने दिली होती. पण नवे सरकार आल्यापासून एकदाही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. नवे सरकार न्यायालयात दिलेला शब्द पाळीत नसून कर्मचा-यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप सुद्धा बरगे यांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या