नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्री दिल्लीत दाखल झाले असून, राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी शिंदेच्या या दौ-याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या सर्वामध्ये आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचे खासदार शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
राज्याचे तीन तुकडे करण्यापूर्वी भाजपने शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी त्याचे तुकडे करण्याचा डाव आखल्याचा हल्लाबोल केला आहे. फक्त आमदार- खासदारच सेनेची ताकद नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बंडामुळे शिवसेनेची ताकद कमी होणार नसल्याचेही ते म्हणाले.
खासदारांच्या घराला सुरक्षेसाठी यंत्रणांचा गैरवापर होत आहे. शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री, त्यांचे दिल्ली दौरे होणारच असेही राऊत म्हणाले. सत्तास्थापनेनंतर उद्भवलेल्या संघर्षात आतापर्यंत शिवसेनेलाच धक्क्यांवर धक्के बसत आहेत मात्र, शिवसेना कोणत्याही संघर्षाला दोन हात करण्यासाठी समर्थ असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच जे होईल ते पाहून घेऊ असे विधानही राऊतांनी केले आहे.