जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी येत आहे. मोहाडी ग्रामपंचायतच्या निकालाकडे जळगाव जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून होते. त्याचा निकाल आता समोर आला आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाल्या आहेत. मात्र, त्यांचे ग्रामविकास पॅनल पराभूत झाले आहे.
दरम्यान राज्यात ३४ जिल्ह्यांत ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. ३४ जिल्ह्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडले. या निवडणुकीचा निकाल आता समोर येत आहे.
भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला १० पैकी फक्त ३ जागा मिळाल्या आहेत. तर भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी तब्बल सात जागा मिळाल्या आहेत. तसेच त्यात लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळाले आहे.
मोहाडी ग्रामपंचायतच्या निकालाकडे जळगाव जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून होते. या ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. मात्र, तरी निकालात त्यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला आहे.