मुंबई : ‘भोंगा’ हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत भाष्य केले. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त झाले. मुस्लिम वर्गाकडून या निर्णयाला मोठा विरोध झाला. शिवाय विरोधी पक्षांकडूनही चिखलफेक करण्यात आली. अशातच ‘भोंगा’ या चित्रपटाचे पोस्टर आले आणि हे प्रकरण अधिकच रंगले. नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर आऊट झाले असून ते प्रचंड व्हायरल होत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘भोंगा’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अत्यंत मार्मिक भाष्य केलेले आहे. यावरून चित्रपटाचा विषय आणि आशय स्पष्ट होतो. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. येत्या ३ मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘आमच्यावेळी धर्म घरात होता आणि बाहेर सगळी माणसे एक होती. आता धर्म आधी येतो आणि मग माणसे’ या वाक्याने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले आहे.
एका इस्लामधर्मीय बाळाला होणा-या आवाजाच्या त्रासामुळे भोंगा बंद करण्याचा प्रस्ताव पुढे येतो. परंतु त्यातून कशा पद्धतीने जातीय तेढ निर्माण होऊ भोंगा हा माणसापेक्षा मोठा बनतो यावर ट्रेलरमधून भाष्य केले आहे. शिवाय ‘अजान देणं धर्माचं काम हाय, पण ती भोंग्यातूनच दिली पाहिजे असं कुठं लिव्हलंय का..?’’ असा प्रश्न या माध्यमातून विचारला गेला आहे. ‘भोंगा ही धार्मिक नाही तर सामाजिक समस्या आहे’ असे बिरूद या चित्रपटाचे आहे.