मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय. संजय राऊतांमुळंच आम्ही शिवसेना सोडली, असं काही बंडखोर आमदारांनी जाहीरपणे म्हटल्यानंतर संजय राऊतांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. होते. या पार्श्वभूमीवर आज सकाळी संजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बंडखोर आमदारांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
‘महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं तेव्हा स्वत: संदीपान भुमरे हे सामना कार्यालयात आले होते आणि माझ्यासमोर त्यांनी लोटांगण घातलं होतं. हवं असेल तर सामना कार्यालयातील व्हिडिओ फुटेज मी दाखवू शकतो.’ असा दावा करत राऊतांनी भुमरेंवर निशाणा साधला.
राऊतांसमोर कधीही लोटांगण घातले नाही : भुमरे
याला उत्तर देताना संदीपान भुमरे म्हणाले, संजय राऊत आमच्यामुळं निवडून आलेत. आमच्या जीवावर त्यांना खासदारकी मिळाली आहे. संजय राऊतांनी राजीनामा द्यावा आणि जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असा इशारा भुमरेंनी राऊतांना दिला आहे. तसेच मी राऊतांसमोर कधीही लोटांगण घातलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.