एक्झिट पोलचा अंदाज, २ मार्चला निकाल
नवी दिल्ली : ईशान्येतील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. त्रिपुरात १६ फेब्रुवारीला आणि मेघालय-नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान झाले. मतदानानंतर सोमवारी संध्याकाळी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये त्रिपुरामध्ये भाजप आघाडीला बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेघालयात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. दुसरीकडे नागालँडमध्ये भाजप युती पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ईशान्येतील तीनही राज्यांमध्ये २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. १८ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने ईशान्य त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या होत्या. १६ आणि २७ फेब्रुवारी रोजी तिन्ही राज्यांमध्ये मतदान झाले. १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत सुमारे ८६.१० टक्के मतदान झाले होते. येथे भाजपची सत्ता आहे. तेथे पुन्हा भाजप बाजी मारण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये ५९ जागांवर निवडणूक झाली होती. त्यावेळी ३५ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
मेघालयात २७ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७४.३२ टक्के मतदान झाले. येथील ६० पैकी ५९ जागांवर मतदान झाले. येथे एनपीपीने ५७, काँग्रेस आणि भाजपने ६०-६० आणि टीएमसीने ५६ जागांसाठी उमेदवार उभे केले.