26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यसभेसाठी मविआची ऑफर भाजपने धुडकावली

राज्यसभेसाठी मविआची ऑफर भाजपने धुडकावली

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने भाजपसाठी राज्यसभा महत्त्वाची असून महाविकास आघाडीने ही तिसरी जागा आमच्यासाठी सोडावी आणि विधान परिषदेची पाचवी जागा न लढवण्याबाबत विचार करू असे भाजपने मविआ शिष्टमंडळाला सांगितले असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता शिवसेना आपली दुसरी जागा लढवण्याच्या भूमिकेवर ठाम राहिली तर निवडणूक होणार आहे. याबाबतचे चित्र दुपारी तीन वाजता स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनील केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली.

राज्यसभा निवडणुकीतून उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेला एक जागा आणखी देऊ असा प्रस्तावही महाविकास आघाडीने भाजपला दिला. या चर्चेत भाजपने तिस-या जागेसाठीचा दावा कायम ठेवला आहे. भाजपकडे सहा सहयोगी अपक्ष आमदारांसह ३० मते अतिरिक्त असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष असून राज्यसभा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचवी जागा लढवणार नसल्याचे भाजपच्या वतीने या बैठकीत सांगण्यात आले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही प्रदेश भाजपच्या भूमिकेवर समाधान व्यक्त केले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या