मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. नव्या समीकरणांची नांदी होण्याची शक्यता वाढली आहे. सेनेच्या वतीने सर्व आमदारांना मुंबईत येण्यासाठी आणि चर्चेचे दरवाजे खुले असल्याची बोळवण होत आहे. मात्र, शिंदे अद्याप बंडावर ठाम आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून १२ आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. मात्र, आमदार पुन्हा पक्षात येतील असा त्यांना विश्वास आहे.
सध्या शिंदे आणि सर्व आमदार भाजपचे सरकार असणा-या आसाम राज्यात आहेत. भाजपच्या सरकारने त्यांना मोठी सुरक्षा पुरवली आहे. याशिवाय सूरतमध्येही भाजप सरकारने शिंदेंच्या बंडाळीला मदत केल्याचा आरोप होत आहे. अखेर भाजप या लढाईत अधिक-तपणे उतरल्याचं आता स्पष्ट झाले आहे. नव्या सरकार स्थापनेसाठी भाजपने पहिला डाव टाकत राज्यपालांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी सध्याच्या सरकारमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
कालपर्यंत हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात येत होते. मात्र, शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात पार पडलेल्या भेटीनंतर भाजपने पहिली खेळी केली आहे. राज्यातील सरकार बरखास्त झाल्यास शिंदे गटाला हाताशी घेऊन भाजप सत्ता स्थापनेचा दावा करू शकते. यासाठी मोठी कायदेशीर लढा देण्याची तयारी दोन्ही पक्षांनी केली आहे.