मुंबई : राज्यातील सत्तांतराची दखल जगातील ३३ देशांनी घेतली. हा एक ऐतिहासिक विजय आहे. अन्यायाविरोधात बंड असेल किंवा उठाव असेल तो करावाच लागतो असे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते. म्हणून शिवसेना वाचविण्यासाठी शहीद झालो तरी चालेल असे ठरविले आणि लढा लढलो आणि विजयी झालो.
महाविकास आघाडीमध्ये माझे सातत्याने खच्चीकरण केले जात होते, विधानपरिषद निवडणुकीवेळी माझ्यावर अन्याय करण्यात आला, म्हणून त्या अन्यायाविरोधात आपण बंड केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलं. त्यानंतर ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे,
– माझं महाविकास आघाडीमध्ये खच्चीकरण करण्यात येत होतं, न्याय मागण्यासाठी बंड केला.
– राज्यात अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये होतो. आम्हाला फार चांगले अनुभव आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानास्पद कोणी लिखाण केले, बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार कोणी काढला.
– विधानपरिषद निवडणुकीवेळी माझ्यावर अन्याय करण्यात आला. आता सेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, पण मागे हटणार नाही.
– माझ्या घरावर दगडफेक करण्याचे आदेश देण्यात आले. पण माझ्या घरावर दगडफेक करणारा अजून जन्माला यायचा आहे.
– आम्ही तिकडे असताना आमचा बाप काढला गेला, कुणी आम्हाला रेडे म्हणाले, कुणी प्रेतं म्हणाले.
– मी शिवसेनेला वेळ दिला, आयुष्य खर्ची केले. शिवसेना म्हणजे माझं कुटुंब समजले.
– आनंद दिघे यांच्यामुळे पुन्हा एकदा कार्यरत झालो. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर सावरलो. अनेक आया-बहिणींचे संसार उद्धस्त करणाऱ्या लेडीज बारविरोधात आंदोलन केले. मी स्वत: १६ बार तोडले. यावेळी माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले.
– आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला, आम्ही गद्दार नाही. न्यायासाठी बंड करायला बाळासाहेबांनी शिकवलं.
– मी कोणत्याही पदाची लालसा ठेवली नाही.
– आमची नैसर्गिक युती ही भाजपसोबत आहे, उद्धव ठाकरेंना हे सांगण्याचा मी पाच वेळा प्रयत्न केला.
– बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या विचारांचे आम्ही शिवसैनिक आहोत.
– हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्यांच्या सोबत सत्तेत कसं बसायचं असा असा सवाल आमदारांनी केला आहे.
– कामाख्या देवीला ४० रेडे पाठवले असं कुणीतरी म्हटले होते. पण देवीने म्हटले की तो बोलणारा रेडा आम्हाला नको.