मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीने केलेल्या कार्यवाहीबाबत ईडीचे आभार मानले. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीचा राजकीय वापर केला आहे.
जेवढे काही गुन्हे दाखल केलेत त्यातील एकतरी गुन्हा सिद्ध झाला आहे का? न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. मोदी सरकारने ईडीचा राजकीय वापर केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, काल पंतप्रधान मोंदी यांनी लोकसभेत दिलेल्या भाषणात ईडीचे जे आभार मानले होते, त्याला प्रत्युत्तर देताना पटोले म्हणाले, काँग्रेसने जर देशाची वाईट अवस्था केली असेल तर नरेंद्र मोदींनी आता एक सांगायला पाहिजे की, तुम्ही आता नऊ वर्षांपासून जो देश चालवित आहात मग तुम्ही काय केले. मोदी यांनी ईडीचे जे आभार मानले, त्यातून त्यांचा फायदा झाला असावा अशी घणाघाती टीका पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
पुढे बोलताना पटोले म्हणाले, एकीकडे प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील सी. जे. हाऊसवर ईडीने कारवाई केली आहे तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदियात होत असलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार असल्याने त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, जनतेचे प्रश्न घेऊन लढणे आणि त्यांची जी नुरा कुस्ती सुरू आहे हे जनतेला माहीत आहे. त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, असे म्हणत अधिक बोलणे टाळले.
कुणीही काँग्रेसला घरचा पक्ष समजू नये
सत्यजित तांबे यांच्या कारवाई प्रकरणी आमदार सुनील केदार यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना नाना पटोले यांनी कुणीही काँग्रेस पक्षाला स्वत:च्या घरचा पक्ष समजू नये. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असले तरीही त्यांनीही काँग्रेस पक्षाला घरचा पक्ष समजू नये. काँग्रेस हा विचारांचा तसेच कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.