27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeउस्मानाबादखोटे आरोप करून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे भाजपचे अभियान

खोटे आरोप करून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे भाजपचे अभियान

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष होणार असल्यामुळे भाजपची मंडळी ऊठसूठ राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर खोटे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे काम करीत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे अभियानच भाजपाची मंडळी राबवीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बुधवारी (दि. २१ सप्टेंबर) उस्मानाबाद येथे आले होते. आढावा बैठकीनंतर शिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार राहुल मोटे, जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, संजय निंबाळकर, मसूद शेख, जिल्हा निरीक्षक रमेश बारसकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यासाठी २१ टीएमसी देण्यासाठी असलेली कृष्णा-गोदावरी उपसा सिंचन योजना फडणवीस सरकारच्या काळात ठप्प होती. आघाडी सरकारच्या काळात मी जलसंपदा मंत्री असताना पहिल्या योजनेसाठी ५०० कोटी व दुस-या योजनेसाठी २५० कोटी रुपयांची तरतूद केली. इतकेच नाही तर त्याची निविदा प्रक्रिया देखील राबविली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने त्यास स्थगिती दिली. मात्र चांगले काम असल्यामुळे ती स्थगिती उठविली असून २०२४ पर्यंत उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात ते पाणी येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केलेले चुकीचे काम निस्तारण्यामध्ये गर्क आहेत. तसेच ४० बंडखोर आमदारांना एकत्रित ठेवणे, त्यांना सांभाळणे, शिवसेनेवर हक्क सांगणे, त्याच्याशिवाय शिंदे दुसरे कामच करू शकत नाहीत. याबरोबरच निवडणूक आयोगाची वारी, दिल्ली वारी, न्यायालयाची वारी यातच व्यस्त आहेत. त्यामुळेच फॉक्सकॉन हा उद्योग गुजरातला गेला आहे. मात्र मोदी यांच्यासमोर ते याबाबत एक शब्दही बोलू शकत नसल्याचा जबरदस्त टोला त्यांनी शिंदे यांना लगावला.

मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना पक्षाची स्थिती चांगली असून लोक त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत. तसेच आगामी निवडणुकीत मुंबई महानगर पालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर युती करणार असल्याचे सांगितले. मात्र काँग्रेसबाबत त्यांनी काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या