24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराज्य सरकारविरुद्ध भाजपचे उद्या ‘माझे आंगण, माझे रणांगण’ आंदोलन !

राज्य सरकारविरुद्ध भाजपचे उद्या ‘माझे आंगण, माझे रणांगण’ आंदोलन !

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाला आळा घालण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीका करताना, प्रभावी उपाययोजना व कोरोनामुळे सामान्यांचे गंभीर आर्थिक नुकसान झाले असल्याने कर्नाटक व अन्य राज्यांप्रमाणे सरकारने पॅकेज जाहीर या मागणीसाठी प्रदेश भाजप शुक्रवारी राज्यभरात ‘मेरा आंगण मेरा रणांगण-महाराष्ट्र बचाव’, आंदोलन करणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र संकटाच्या काळात राजकारण करणाºया भाजपवर जोरदार टीका केली आहे.

राज्याची, विशेषत: मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, कोरोनाचे संकट हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे टीका भाजपने केली आहे. राज्य सरकारला आवश्यक निर्देश द्यावेत, कोरोनामुळे सामान्यांचे गंभीर आर्थिक नुकसान झाले असल्याने कर्नाटक व अन्य राज्यांप्रमाणे सरकारने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन केली होती.
आता २२ मे रोजी भाजप राज्यात ‘मेरा आंगण मेरा रणांगण-महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. या आंदोलनात सोशल डिस्टन्स्ािंगच्या नियमांचे पालन केले जाईल. राज्यातील जनतेने आपल्या घराबाहेर येऊन काळे मास्क, काळे शर्ट, काळी रीबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

Read More  चीनवर बहिष्कार टाकला पाहिजे -आठवले

घराच्या आंगणाला रणांगण बनवण्याला शहाणपण म्हणत नाहीत- अजित पवार
स्वत:च्या घराच्या आंगणालाच ‘रणांगण’ बनवणे याला शहाणपण म्हणत नाही. आज, महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध शर्थीने लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणे हा समस्त कोरोना योध्दांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची एकजुटीने लढाई लढत असताना अशा आंदोलनातून या लढाईत अडथळे निर्माण करण्याचा, महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न राज्यातील जनताच हाणून पाडेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले. हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे.

या आंदोलनातून महाराष्ट्राचे आणि भाजपचे काहीही भले होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्न आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

महाराष्ट्र नव्हे, भाजप बचाओ आंदोलन -बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र भाजपने सुरू केलेले आंदोलन हे महाराष्ट्र बचाओ आंदोलन नसून, भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही, त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून ह्या आंदोलनाचा फार्स उभा केला जात आहे, अशी टीका महसूल मंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री निधीला मदत करायची सोडून पीएम केअरला मदत केली. देवेन्द्र फडणवीस आणि त्यांच्या सहका-यांना महाराष्ट्र सरकार बरोबर बोलायचे नाही, त्यांना रोज राजभवनावर जाऊन राज्यपालांसोबतच चर्चा करायची आहे. आम्ही त्यांचे ऐकायला तयार आहोत.

मात्र त्यांना महाराष्ट्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची आहे, संकटातून मार्ग काढण्यापेक्षाही सरकार अडचणीत कसे येईल यात त्यांना अधिक स्वारस्य आहे. खरे तर फडणवीसांची निष्ठा महाराष्ट्रासोबत नाही ती दिल्लीतल्या भाजप नेत्यांसोबत आहे, असाही आरोप थोरात यांनी केला. संकटकाळात भाजपच्या या वागण्याला महाराष्ट्रद्रोहच म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील जनतेला सरकार करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची जाणिव आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत. अशावेळी भाजपकडून सुरू असलेले गलिच्छ राजकारण जनता कधीही मान्य करणार नाही. उलट ती या चुकीच्या राजकारणाचा निषेध करेल, आणि भाजपला धडा शिकवेल असे थोरात म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या