नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात धार्मिक वाद उफाळून आला आहे. हिंदू विरुध्द मुस्लिम अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. त्यातच आता भाजपच्या काही नेत्यांनी मुस्लिम धर्मावर टीका करून रोष ओढवून घेतला आहे. मोहम्मद पैगंबरांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणे भाजपच्या चांगलेच अंगलट आले आहे. जागतिक पातळीवर याचे पडसाद उमटताच धास्तावलेल्या भाजपाने बोलघेवड्या नेत्यांना लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे.
धार्मिक भावना दुखावणा-या पक्षातील ३८ नेत्यांची यादी भाजपने तयार केली आहे. पैगंबरांवरील वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी नुपूर शर्मा व नवीनकुमार जिंदल यांच्यावर कारवाई केल्यानंतर भाजपने मागील ८ वर्षांत भाजप नेत्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्ये आयटी तज्ज्ञांच्या मदतीने शोधून काढली. यामध्ये सुमारे २७०० वक्तव्यांतील शब्द हे संवेदनशील आढळले. ३८ नेत्यांनी धार्मिक भावना दुखावल्याचे दिसून आले.
यातील २७ नेत्यांना अशी वक्तव्ये करू नयेत. पक्षाच्या परवानगीशिवाय धार्मिक मुद्यांवर वक्तव्य करू नये, अशी सक्त ताकीद त्यांना देण्यात आली आहे. भाजपच्या ३८ नेत्यांची वक्तव्ये ही धार्मिक भावना दुखावणा-या गटात आढळली. या वादग्रस्त नेत्यांत अनंतकुमार हेगडे, गिरिराज सिंह, विनय कटियार, तथागत राय, शोभा वरंदलाजे, प्रताप सिम्हा, महेश शर्मा, टी. राजा सिंह, विक्रमसिंह सैनी, साक्षी महाराज, संगीत सोम आदींच्या वक्तव्यांचा समावेश आहे.
‘अल कायदा’ ची भारताला थेट धमकी
अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतात आत्मघाती हल्ल्याची धमकी दिली आहे. अल कायदाने ६ जून रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्रात गुजरात, यूपी, मुंबई आणि दिल्लीत आत्मघाती हल्ला करण्यास तयार असल्याची धमकी दिली आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांनी क्षयरोगाच्या चर्चेदरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल अल कायदाने ही धमकी दिली आहे.
१४ देशांत संताप
भारताविरोधात निदर्शने करणा-या देशांमध्ये इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लिबिया, इंडोनेशिया आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. याशिवाय भारतातील भाजप प्रवक्त्यांविरोधात विरोधी पक्ष सातत्याने नाराजी व्यक्त करत आहेत. शर्मा यांना अटक करण्याची मागणी होत आहे.