नवी दिल्ली : आशियाई आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये पदक विजेती भारतीय महिला बॉक्सर सरिता देवीलाही कोरोनाची लागण झाली आहे. मणिपूरमधील इम्फाळ येथे रहात असलेल्या सरिता देवीचा कोरोना अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी सरिता देवीला ताप आणि घशात खवखव होत होती. यानंतर सरिता देवी आणि तिच्या पतीने स्थानिक कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये कोरोनाची चाचणी केली, ज्यात सरिता देवी आणि तिच्या पतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
‘‘काही दिवसांपूर्वी माझ्या वहिनीने बाळाला जन्म दिला. तिला आणि माझ्या भावाला भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी गेले होते. त्यांच्या घरून आल्यानंतर मला ताप, सर्दी आणि घसा खवखवण्याची समस्या सुरू झाली. सुरुवातीला प्रवासामुळे हा त्रास जाणवत असेल असे मला वाटले, पण तीन दिवसांनंतर मला कोरोनाची सर्व प्राथमिक लक्षणे जाणवत होती. खबरदारी म्हणून मी आणि माझ्या पतीने चाचणी केली, ज्यात आमचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुदैवाने माझा ८ वर्षांचा मुलगा व त्याची इतर भावंडं यांना कोरोनाची लागण झालेली नसल्याचे निष्पन्न झालेय.’’ असे सरिता देवी म्हणाली.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ३ वेळा विजेतेपद, आशियाई खेळांमध्ये ५ पदकं अशी कामगिरी करणारी सरिता देवी ही भारतामधली प्रमुख महिला बॉक्सर मानली जाते. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सरिता देवी आणि तिच्या पतीला इम्फाळ येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
‘एमआयएम’च्या समर्थकांना ब्लॉक करणार; फेसबुक व युट्युबने उच्च न्यायालयाला दिली माहिती