37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्रीडाबुमराहची विक्रमी गोलंदाजी ठरवली फलंदाजांनी व्यर्थ

बुमराहची विक्रमी गोलंदाजी ठरवली फलंदाजांनी व्यर्थ

एकमत ऑनलाईन

कोलकाता विरुद्ध मुंबई यांच्यात डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्टस् अकादमी स्टेडियमवर झालेला आयपीएल २०२२चा ५६वा सामना कोलकाताने ५२ धावांनी जिंकला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली . मुंबईकडून जसप्रीत बुमराहने १० धावा देत ५ विकेट्स घेतल्या आणि कोलकाताला १६५ धावांवर रोखले. परंतु प्रत्युत्तरात मुंबईच्या फलंदाजांनी निराशा केली. ईशान किशनव्यतिरिक्त एकही फलंदाज साधे अर्धशतकही करू शकला नाही आणि मुंबईचा संघ १७.३ षटकांतच ११३ धावांवर सर्वबाद झाला. परिणामी त्यांनी ५२ धावांनी हा सामना गमावला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाकडून वेंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांनी जोरदार फटकेबाजी केली. वेंकटेशने २४ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या, तर राणानेही २६ चेंडंूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४३ धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त अजिंक्य रहाणेने २५ आणि रिंकू सिंगने २३ धावांचे योगदान दिले. कर्णधार श्रेयस अय्यरला फक्त ६ धावा करता आल्या. खालच्या फळीतील ३ फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने चकित करणारी कामगिरी केली. त्याने ४ षटकांत १ निर्धाव षटक टाकत १० धावांत सर्वाधिक ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. बुमराहची ही आतापर्यंतची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी होती. या कामगिरीमुळे बुमराह आयपीएलमध्ये सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी करणा-या खेळाडूंच्या यादीत सामील झाला. त्याच्याव्यतिरिक्त कुमार कार्तिकेय याने २ विकेट्स घेतल्या. तसेच, डॅनियल सॅम्स आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी संघ म्हणून ओळखला जाणारा मुंबई इंडियन्स संघ खराब फॉर्ममध्ये आहे. सोमवारी चालू हंगामातील खराब प्रदर्शनाचे त्यांनी पुन्हा एकदा प्रदर्शन केले. कर्णधार रोहित शर्माने सामना संपल्यानंतर पराभवाचे खापर संघाच्या फलंदाजांवर फोडले केकेआरविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर रोहित म्हणाला की, ‘‘गोलंदाजांत बुमराह खास ठरला. फलंदाजांनी खराब फलंदाजी केली. खरेतर या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड नव्हते. आम्ही याठिकाणी आमचा चौथा सामना खेळत आहोत. आम्हाला माहिती आहे की, वेगवान गोलंदाजांना खेळपट्टी थोडी अनुकूल असेल. आम्हाला भक्कम भागीदारी करता आली नाही आणि अशा प्रकारच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भागीदारी गरजेची असते.’’
केकेआरला अजून कमी धावसंख्येवर रोखणे शक्य होते का? या प्रश्नावर रोहित म्हणाला, ‘‘हे शक्य नव्हते. कारण १० षटकांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते खूप पुढे होते. आम्ही उत्कृष्ट गोलंदाजी करून चांगले पुनरागमन केले. बुमराह आणि संपूर्ण गोलंदाजांनी आक्रमणाचे प्रयत्न चांगले केल.े मुंबईच्या फलंदाजांनी एका पाठोपाठ एक अशा स्वस्तात विकेट्स गमावल्या आणि ११३ धावांवर सर्वबाद झाले. हा त्यांचा हंगामातील पाचवा विजय होता. कोलकाताच्या या विजयाचा हिरो पॅट कमिन्स ठरला. सामना जरी कोलकाताने जिंकला असला, तरीही मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला त्याच्या शानदार प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मुंबई कर्णधार रोहित शर्माच्या बाद देण्यात गोंधळ झाला. कोलकाताने डीआरएस घेतल्यानंतर जेव्हा रिप्ले पाहिला गेला, तेव्हा असे दिसले की, चेंडू रोहितच्या बॅटला लागण्याआधीच स्निको मीटरमध्ये हलकासा आवाज आला होता. तसे पाहिले, तर चेंडू बॅटला लागल्यानंतर या मीटरमध्ये हालचाल दिसली पाहिजे, पण रोहितच्या बाबतीत काहीतरी गडबड असल्याचे दिसले. याच कारणास्तव त्याचे चाहते पंचांच्या निर्णयावर शंका उपस्थित करत आहेत. रोहित शर्मा स्वत: देखील पंचांच्या या निर्णयानंतर हैराण होता. काही वेळ तो खेळपट्टीवर उभा राहिला, पण नंतर त्याला मैदान सोडावे लागले. सोशल मीडियावर याविषयी वातावरण चांगलेच तापले आहे.
या विजयासह कोलकाताला गुणतालिकेत फायदा झाला. ते सातव्या स्थानी पोहोचले आहेत. दुसरीकडे, नवव्या पराभवासह मुंबई पुन्हा तळाशी कायम राहिली.
– डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या