24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयराणेंना कॅबिनेट, डॉ. कराड, पाटील, पवार नवे राज्यमंत्री

राणेंना कॅबिनेट, डॉ. कराड, पाटील, पवार नवे राज्यमंत्री

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराला बुधवारी मुहूर्त मिळाला असून मोदी सरकारचा हा जम्बो मंत्रिमंडळ विस्तार ठरला. कारण ४३ मंत्र्यांना राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये मंत्रिपदाची शपथ दिली. त्यात १५ कॅबिनेट, तर २८ राज्यमंत्र्यांंचा समावेश असून, ब-याच नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे नवे कॅबिनेटमंत्री, तर भारती पवार, कपिल पाटील आणि औरंगाबादचे डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रिपद मिळाले, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील दिग्गज नेते प्रकाश जावडेकर यांच्यासह संजय धोत्रे यांच्यासह १२ विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्यात आला.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच खाते वाटपही करण्यात आले असून, अपेक्षेप्रमाणे नव्याने स्थापन केलेल्या सहकार खात्याचा अतिरिक्त पदभार अमित शहांकडे देण्यात आला आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील सहकारावर वॉच ठेवण्याची खेळी खेळण्याची शक्यता आहे. नारायण राणेंकडे लघु व मध्यम उद्योग, ज्योतिरादित्य शिंदेंकडे हवाई वाहतूक खाते देण्यात आले. विशेष म्हणजे डॉ. हर्षवर्धन यांना राजीनामा द्यायला लावल्यानंतर कोरोनाच्या काळात आरोग्य खाते कोणाकडे जाणार, याची चर्चा होती. मात्र, मनसुख मांडवीय यांच्याकडे आरोग्य व खते, रसायन मंत्रीपद देण्यात आले. दरम्यान, पियुष गोयल, स्मृती ईराणींकडील महत्त्वाचे खाते काढून घेऊन त्यांनाही एक प्रकारे धक्का दिला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील भागवत कराड यांच्याकडे अर्थ राज्यमंत्रिपद, कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज, भारती पवार यांच्याकडे आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्रिपद देण्यात आले.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र, मुहूर्त ठरत नव्हता. अखेर बुधवारी सायंकाळी मोदी सरकारचा जम्बो मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. आगामी काळातील निवडणुका आणि नवीन राजकीय समीकरणाचा विचार करून अनेक नव्या चेह-यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुका आणि भविष्यातील राजकीय समीकरणाचा विचार करून चार नव्या चेह-यांना संधी देण्यात आली. त्यात शिवसेनेला शह देण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद, तर नाशिक जिल्ह्यातील भारती पवार, भिवंडीतील कपिल पाटील, औरंगाबादमधील डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रिपदाची संधी दिली. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल, अशी शक्यता होती. मात्र, त्यांचा हिरमोड झाला, तर रावसाहेब दानवे यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांचे राज्यमंत्रिपद कायम राहिले. दरम्यान, उत्तर प्रदेशातही आगामी काळातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन ७ जणांना मंत्रिपद दिले. तसेच गुजरातमधील तिघांना संधी मिळाली.

आज एकूण ४३ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. त्यामध्ये सर्वप्रथम नारायण राणे, त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, वीरेंद्रकुमार, पशुपतीकुमार पारस यांच्यासह एकूण १५ जणांना कॅबिनेट मंत्रिपद, तर महाराष्ट्रातील तीन राज्यमंत्र्यांसह २८ जणांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. एकीकडे अनेक नव्या चेह-यांना संधी देतानाच दुसरीकडे दिग्गज मत्री म्हणून ओळख असलेल्या प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन यांच्यासह १२ विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळाला. त्यामुळे यावेळी मोठा फेरबदल पाहायला मिळाला.

जावडेकरांसह १२ मंत्र्यांना नारळ
महाराष्ट्राचे दिग्गज नेते तथा केंद्रीय माहिती व प्रसारण आणि अवजड उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगार मंत्री संतोष गंगवार, रविशंकर प्रसाद, सदानंद गौडा, थावरचंद गेहलोत, बाबूल सुप्रियो, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया, प्रतापचंद्र सारंगी, सुश्री देबश्री चौधरी यांचा समावेश आहे.

७ महिलांना संधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी मंत्रिमंडळात मिनाक्षी लेखी यांच्यासह ७ महिलांना संधी दिली आहे. महिला मंत्र्यांमध्ये अनुप्रियासिंह पटेल, शोभा करंदलाजे, मिनाक्षी लेखी, अन्नपुर्णा देवी, भारती प्रवीण पवार, दर्शना विक्रम जारदोश यांचा समावेश आहे.

देशातील लसीकरणात तब्बल ३२ टक्के घट!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या