सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगार आपापल्या राज्यांमध्ये पायी चालत निघाले आहेत, रस्त्याने चालताना त्यांचे अपघात होत आहेत. नुकताच औरंगाबादमध्ये मालगाडी अंगावरून गेल्याने रेल्वेरुळावर झोपलेल्या १६ जणांचा मृत्यू झाला होता. या स्थलांतरीत मजुरांना थांबविण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
औरंगाबादमध्ये ८ मे रोजी रेल्वेरुळावर झोपलेले १६ मजूर मालगाडीखाली चिरडले गेले होते. या घटनमुळे स्थलांतरीत मजुरांचे हाल आणि त्यांच्यावरील संकटांची भीषणता देशभर पाहिली गेली होती. यावर वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याला फटकारत सुप्रीम कोर्टाने ही याचिका नाकारली.
Read More जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना तपासणी करुनच एण्ट्री
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या समोर ही याचिका सुनावणीसाठी आली. यावेळी राव यांनी वृत्त पत्रांच्या कात्रणांवरून आपण यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तसेच कोण रेल्वे रुळावरून चालत आहे किंवा कोण नाही? यावर लक्ष ठेवणे अशक्य आहे. जर लोक गावी चालत जात असतील आणि थांबत नसतील तर त्यांना आम्ही कसे थांबवू शकतो, असा प्रश्न विचारला. तसेच यावर राज्य सरकारांनी पाऊले उचलायला हवीत असेही न्यायालयाने म्हटले.
औरंगाबादच्या रेल्वे अपघातावर राव यांनी, जर कोणी रेल्वे रुळावर झोपत असेल तर कोण असे अपघात रोखू शकेल? असा प्रश्न विचारत याचिका फेटाळून लावली. यावेळी सरकारी पक्षाचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, प्रत्येक मजूर, कामगाराची त्याच्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली जात आहे. मात्र, त्यांच्याकडे संयम नाहीय. अशांना आम्ही थांबवू शकत नाही.