नवी दिल्ली : जपानमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ अव्वल कामगिरी करेल व सुवर्णपदकाला गवसणी घालेल. भारतीय हॉकी संघाचे गतवैभव परत मिळवून देणारच, असा विश्वास व निर्धार कर्णधार राणी रामपाल हिने व्यक्त केला आहे.
या स्पर्धेसाठी ज्या पात्रता स्पर्धा झाल्या त्यात सुरुवातीला संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती. मात्र, त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय पात्रता स्पर्धेतील लढतीत अमेरिकेचा ५-१ असा मोठा पराभव करण्यात यश मिळाले. या विजयानंतरही दुसरा सामना तितकाच महत्त्वाचा होता. त्यात एक क्षण ५-५ अशी बरोबरी झाली होती. त्यावेळी मला गोल करता आला व संघाला निसटता विजय मिळाला. यामुळेच आम्हाला टोकियो ऑलिम्पिकची पात्रता मिळाली. अर्थात, आम्ही ऑलिम्पिकला पात्र झालो यावर अजूनही विश्वास बसत नाही, असेही राणीने नमूद केले.
कोरोनाचा धोका वाढल्याने टोकियो ऑलिम्पिक एक वर्षाने पुढे ढकलले गेल्याने खूप निराश झालो होतो. मात्र, सकारात्मक विचार केला व लक्षात आले की या मिळालेल्या वेळेचा संघाला लाभच होणार आहे. गेल्या मोसमापासून आम्ही सातत्याने स्पर्धा खेळत होतो. खेळाडूंना स्पर्धांमधून तसेच सरावामधूनही विश्रांती आवश्यक होती ती लॉकडाऊनमुळे मिळाली. आपल्या किंवा परदेशी संघांच्या सामन्यांचे चित्रीकरण पाहून आपल्या खेळातील कमकुवत दुवे अभ्यासण्याची व चुका दुरुस्त करण्याची नामी संधी आता सर्व खेळाडूंना मिळाली आहे.
Read More जिल्ह्यात कोरोनाबाधितांची पन्नाशी पार
भारतीय हॉकी महासंघाने खेळाडूंचे सराव शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले तेव्हा खूपच हुरूप आला. सध्या देशात असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडूंना आपापल्या घरातच राहावे लागत असले तरीही ज्यांना शक्य आहे त्यांना सरकारच्या नियमांचे पालन करून वैयक्तिक सराव करता येत आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून मीदेखील काही दिवसांपूर्वी सरावाला प्रारंभ केला असून ठरलेल्या वेळापत्रकानुसारच हा सराव होत आहे. महिला संघ गेल्या मोसमापासून सातत्यपूर्ण खेळ करत आहे.
सांघिक सरावाच्या प्रतीक्षेत
कोरोनाच्या धोक्यामुळे सध्या खेळाडूंना वैयक्तिक सरावाला परवानगी मिळाली असली तरीही हॉकी हा खेळ सांघिक असल्याने सर्व खेळाडूंना एकत्रित सराव मिळाला तरच त्याचा प्रत्यक्ष स्पर्धेत फायदा होईल. त्यामुळे आता आम्हाला एकत्रित सराव कधीपासून सुरू करता येईल याबाबतच्या निर्णयाचीच सध्या प्रतीक्षा असल्याचेही राणीने स्पष्ट केले.