32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeराष्ट्रीयउत्तर प्रदेशातील टीआरपी प्रकरणाचा तपास विद्युतवेगाने सीबीआयकडे

उत्तर प्रदेशातील टीआरपी प्रकरणाचा तपास विद्युतवेगाने सीबीआयकडे

एकमत ऑनलाईन

लखनौ : महाराष्ट्रामध्ये सध्या टीआरपी घोटाळा गाजत आहे. भ्रष्ट पद्धतीने टीआरपी वाढवून घेतल्याच्या आरोपाखाली काही वृत्तवाहिन्यांची चौकशी सुरु झाली आहे. आता असाच प्रकार उत्तरप्रदेशमध्येही घडला असून तीन दिवसांपूर्वी लखनौमध्ये एका व्यावसायिकाने टीआरपी मानांकनामध्ये करण्यात येत असलेल्या गैरव्यवहारांच्या विरोधात अज्ञात इसमांविरोधातील तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे उत्तरप्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून होण्याची शिफारस केंद्राकडे केली व ती केंद्राने तत्परतेने मान्यही केली. यंत्रणांच्या या तत्परतेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

देशातील गुन्ह्यांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याच्या निर्णयाला यापूर्वी अनेक दिवस लागत होते. मात्र मंगळवारी सरकारी यंत्रणांनी त्या सगळ्याला छेद दिला. लखनौच्या हजरतगंज पोलिस ठाण्यामध्ये एका खासगी कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकां च्या वतीने एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंदिरानगर येथील गोल्डन रॅबिट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे कमल शर्मा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यामध्ये टीआरपी मानांकनासाठी गोळा करण्यात येत असलेल्या माहितीमध्ये गैरव्यवहार करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे ही मानांकने ठरविताना गोळा करण्यात आलेल्या माहितीमध्ये फेरफार करण्यात आल्याचाही आरोप केला आहे. या सगळ्यांमुळे विविध जाहिरात एजन्सींची दिशाभूल झाली असून त्यांचे नुकसान झाल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी शनिवारी आलेल्या या तक्रारीची दखल घेऊन, तातडीने भारतीय दंड विधानाचे कलम ४६८, ४६५, ४६३, ४२०, ४०९, ४०६ व १२० ब कलमांखाली अज्ञात इसमांवर गुन्हाही दाखल केला आहे.

गुन्ह्याबाबत कमालीची गुप्तता
हजरतगंज पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल होताच उत्तर प्रदेश सरकारच्या गृह विभागाने त्याची दखल घेतली. शनिवारी दाखल झालेल्या या गुन्ह्याबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली होती. त्यानंतर झालेल्या अधिका-यांच्या बैठकीत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर गृह विभागाने तातडीने याबाबतची शिफारस केंद्र सरकारकडे केली. मंगळवारी याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी करून, हा तपास आता सीबीआयकडे देण्यात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर सीबीआयच्या वतीने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास त्याच्या आधारे करण्यात येणार आहे.

मुंबईतील प्रकरणाचे भवितव्य काय? महाराष्ट्रातील प्रकरणही सीबीआयकडे जाणार ?
काही दिवसांपूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त पारंबीरसिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन टीआरपी मानांकने ठरविण्यात गैरव्यवहार होत असून, त्यामध्ये रिपब्लिक आणि दोन मराठी वाहिन्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काही जणांना अटकही करण्यात आली होती. आता उत्तर प्रदेशमधील यासंबंधीचे प्रकरण सीबीआयकडे गेल्याने मुंबईत दाखल झालेला गुन्हाही सीबीआयकडे जाणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी अभिनेता सुशांतस्ािंह राजपूत प्रकरणामध्येही बिहार मध्ये दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला गेला होता. मुंबईतील प्रकरणही सीबीआयकडे सोपविण्यासाठी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

देशमुखांचे कानावर हात
दरम्यान, महाराष्ट्रातील टीआरपी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाणार का, या प्रश्नावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या