26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीय‘गूगल पे’भोवती सीसीआयचा फास

‘गूगल पे’भोवती सीसीआयचा फास

अयोग्य व्यवसायप्रकरणी गूगलविरोधात चौकशीचे आदेश; कलम ४ चे उल्लंघन केल्याचा आरोप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट अ‍ॅप गूगल पेच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, कंपिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) गुगल पे ने कथितरित्या अयोग्य व्यवसाय पद्धतीचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी गूगलच्या विरोधात सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. कंपनीने कायद्याच्या कलम ४ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आयोगाचे प्राथमिक मत आहे, असे सीसीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे.

नियामकाने या प्रकरणी आपल्या महासंचालकांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गुगल पे ने कथितरित्या अयोग्य व्यवसाय पद्धतीचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आयोगाच्या कायद्याचे कलम ४ हे एखाद्याने बाजारात आपल्या वर्चस्वाचा दुरूपयोग केल्यासंबंधी आहे.

गूगल इंडियासह संलग्णीत पाच कंपन्यांविरोधात तपास
सीसीआयने अल्फाबेट इंक, गूगल एलएलसी, गूगल आयर्लंड लिमिटेड, गूगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. गूगल सध्या जे काही करत आहे ते अयोग्य आहे आणि त्यांनी भेदभाव करणा-या अटी शर्थी ठेवल्या आहेत. याअंतर्गत, गुगल पेच्या स्पर्धक ऍप्सना बाजारात प्रवेश प्रदान केला जात नाही, असे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे, असे सीसीआयने सांगितले.

कमिशनबाबत चिंता
पैसे देऊन वापरण्यात येणारी ऍप्स आणि ऍप्समध्ये असलेल्या कोणत्याही सेवांच्या उपयोगासाठी देण्यात येणा-या पैशांवर ३० टक्के कमिशन देण्याच्या गुगलच्या निर्णयावर भारतीय ऍप्स विकासकांनी चिंता व्यक्त केली आहे. ब-याच विकासकांचे म्हणणे आहे की कंपनी देशांतर्गत ऍप विकासकांना त्यांच्या डिजिटल सेवा विक्रीसाठी गुगलच्या बिलिंग सिस्टमचा वापर अनिवार्य करण्यास भाग पाडू शकत नाही.

ग्राहकांचा विश्वास हेच प्राधान्य : गूगल
यानंतर गुगलनेही प्रतिक्रिया देत सीसीआयने अनेक दाव्यांना फेटाळल्याचा आम्हाला आनंद असल्याचे म्हटले. गूगल पे अत्यंत स्पर्धात्मक पद्धतीने चालविले जात आहे आणि ग्राहक त्याची सेवा साधी आणि सुरक्षित असल्यामुळे त्याला प्राधान्य देतात हेच त्याचे यश आहे, हे तपासणीदरम्यान दिसून येईल, असेही गुगल पेच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले.

संजय राऊतांकडून फडणवीसांचे अभिनंदन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या