मुंबई : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या नुपूर शर्मांचं समर्थन केल्याने शिवणकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानच्या उदयपूरमध्ये घडला. कन्हैय्यालाल असे या व्यावसायिकाचे नाव असून हत्येप्रकरणी मोहम्मद आणि रियाझ अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.
हल्लेखोरांनी कन्हैय्यालाल यांच्या दुकानात घुसून तलवारीने वार केले आणि या हल्ल्याचा व्हीडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. या घटनेनंतर उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून या हत्येच्या निषेधार्थ स्थानिकांनी आंदोलन सुरू केले आहे. या घटनेबाबत सर्वच स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली आहे.
विवेक अग्निहोत्री यांचे ट्विट-
‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी उदयपूर घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘एक सच्चा हिंदू बनणं आणि हिंदुस्थानमध्ये जगणं अशक्य होत आहे. जगण्यासाठी एकतर शहरी नक्षल बना किंवा गायब व्हा किंवा मारले जा. रालिव, गालिव, चालिव, असे ट्विट त्यांनी केले.
भयभीत, दु:खी, नाराज – अनुपम खेर
बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अनुपम खेर यांनीही या हत्येबद्दल संताप व्यक्त केला. या हत्येबद्दल त्यांनी आपली नाराजी तीन शब्दांत व्यक्त केली. ‘‘भयभीत, दु:खी, नाराज,’’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
मी सुन्न झालेय – कंगना
‘नुपूर शर्माला पाठिंबा दिल्याने या व्यक्तीला मारण्यात आलं. मारेकरी जबरदस्तीने त्यांच्या दुकानात घुसले आणि घोषणाबाजी करू लागले. हे सर्व देवाच्या नावाने झाले. हत्येनंतर दोघांनी अशा पोज दिल्या आणि व्हीडीओही बनवले. मी हे व्हीडीओ पाहण्याचे धाडसही करू शकत नाही. मी सुन्न झालेय’, असे कंगनाने लिहिले आहे.
इरफान पठाणचे उदयपूर हत्याकांडावर आवाहन
भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि वेंकटेश प्रसाद यांनी उदयपूर हत्याकांडावर दु:ख व्यक्त केले आहे. दोघांनी सर्वांनाच शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
शांतता आणि संयम राखा : वेंकटेश प्रसाद
‘‘उदयपूरमधील घटना खूपच दु:खद आहे. या कठीण काळात मी सर्वांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन करतो. कायद्याने कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे’’ असे वेंकटेश प्रसादने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मानवता दुखावली : इरफान पठाण
इरफान पठाणलाही उदयपूर घटनेने हादरवून सोडले आहे. त्यानेसुद्धा ट्विट करून आपल्या भावना मांडल्या आहेत. ‘‘तुम्ही कशावर विश्वास ठेवता, याने फरक पडत नाही. कुठल्याही निर्दोष व्यक्तीला दुखावणे हे संपूर्ण मानवतेला दुखावण्यासारखे आहे’’ असे इरफान पठाणने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.