25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयतब्बल ७५ वर्षांनंतर देशात चित्ता दिसणार!

तब्बल ७५ वर्षांनंतर देशात चित्ता दिसणार!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतातील वन्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातून नामशेष झालेला चित्ता लवकरच देशात परतणार आहे. नामीबिया भारताला प्रत्येकी चार नर व मादी चित्त्यांची पहिली तुकडी देणार आहे. त्यासाठी दोन्ही देशांदरम्यान महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली.

साधारणत: स्वातंत्र्यानंतर नामशेष झालेला चित्ता भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा अवतरणार असून चित्त्यांची ही तुकडी स्वातंत्र्यदिनापूर्वीच देशात येण्याची शक्यता आहे हाही सुखद योगायोग. भारतात १९४८ ला जगातील सर्वांत वेगवान प्राणी समजल्या जाणा-या चित्त्याचे शेवटचे दर्शन झाले होते. त्यानंतर, १९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.

दरम्यान, चित्त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेबरोबरही चर्चा सुरू असून लवकरच सामंजस्य करार होईल. नामिबियाकडून दिले जाणारे चित्ते मध्य प्रदेशातील शेओपूर जिल्ह्यातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात ठेवले जातील. स्वातंत्र्यदिनापूर्वीच म्हणजे १५ ऑगस्टपूर्वी हे चित्ते भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. भारतातून पूर्णपणे नामशेष झालेला चित्ता हा एकमेव मांसाहारी प्राणी आहे. अतिशिकार व अधिवास गमावल्यामुळे चित्त्याचे भारतातील अस्तित्व प्रामुख्याने संपुष्टात आले.

छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील साल जंगलात १९४८ मध्ये चित्त्याने शेवटचे दर्शन दिले होते. त्यामुळे, जवळपास ७५ वर्षांनंतर नामिबियाच्या मदतीने चित्ता भारतात परतत आहे. जगात सर्वांत जास्त चित्त्यांची संख्या नामिबियात आहे.

काय आहे करार?
भारत व नामिबियातील करारानुसार दोन्ही देश चित्ता संवर्धनाला चालना देण्यासाठी कौशल्य व क्षमतांची देवाणघेवाण करतील. पर्यावरणीय प्रशासन, पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन, प्रदूषण आणि कचरा व्यवस्थापन, तांत्रिक कौशल्य आदी क्षेत्रांमध्येही एकमेकांना सहकार्य करतील. वन्यजीव व्यवस्थापनातही परस्परांच्या कर्मचा-यांना प्रशिक्षित करतील.

कुनो उद्यानाचीच निवड का?
चित्त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी २०१० आणि २०१२ दरम्यान दहा ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. उद्यानाची २१ चित्त्यांना सामावून घेण्याची क्षमता आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या माध्यमातून चित्ता पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी निधी दिला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या