37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्रीडामुंबईविरुद्ध चारीमुंड्या चीत झाल्याने चेन्नई स्पर्धेतून बाद

मुंबईविरुद्ध चारीमुंड्या चीत झाल्याने चेन्नई स्पर्धेतून बाद

एकमत ऑनलाईन

इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मधील ५९वा सामना मुंबई विरुद्ध चेन्नई मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. हा सामना मुंबईने ५ गडी व ३१ चेंडू राखून खिशात घातला. हा मुंबईचा हंगामातील तिसरा विजय. या पराभवामुळे चेन्नईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा धुळीस मिळाल्या.
आपल्या घरच्या मैदानावर वानखेडेवर मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीला आलेल्या चेन्नईचा डाव १६ षटकांत ९७ धावांवरच संपुष्टात आला. हे आव्हान मुंबई संघाने १४.५ षटकांत ५ गडी गमावत पार केले. मुंबईकडून फलंदाजी करताना तिलक वर्माने सर्वाधिक ३२ चेंडंूत नाबाद ३४ धावा केल्या. ऋतिक शोकीन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी प्रत्येकी १८ धावांचे योगदान दिले. तसेच, टीम डेव्हिडने नाबाद १६ धावा करत विजयी षटकाराने सामना जिंकून दिला. त्यापूर्वी फॉर्मशी झगडणा-या ईशान किशनने फक्त ६ धावा केल्या. डॅनियल सॅम्स (१) आणि ट्रिस्टन स्टब्स (०) यांना खास कामगिरी करता आली नाही. यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना मुकेश चौधरीने ४ षटकांत २३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. सिमरजीत सिंग आणि मोईन अली यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली. वानखेडेवर मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईची चांगलीच दाणादाण उडवली. भेदक मा-यामुळे सीएसकेला डावातील संपूर्ण २० षटके देखील खेळून काढता आली नाहीत. चेन्नईने पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये पाच महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. यामध्ये डेवॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू यांचा समावेश होता. ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही दोन वेळा सीएसकेने अशाप्रकारे चाहत्यांची निराशा केली होती. विशेष बाब म्हणजे यापूर्वी दोन वेळा आयपीएल २०२०मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सीएसकेने पॉवरप्लेमध्ये २४ धावा करून ५ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर आयपीएल २०२१मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध पुन्हा एकदा सीएसकेने पॉवरप्लेमध्ये ५ विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी तिस-यांदा गुरुवारी मुंबईविरुद्धच्या सामन्यात सीएसकेने ३५ धावा करून पॉवरप्ले संपण्याच्या आधीच ५ विकेट्स गमावल्या. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाकडून कर्णधार एम. एस. धोनीने ३३ चेंडंूत २ षटकार आणि ४ चौकारांची बरसात करत नाबाद ३६ धावांचे योगदान दिले.
वानखेडेवर पहिल्याच षटकादरम्यान वीजपुरवठा खंडित झाला. याचा चेन्नईला फटका बसला. पहिल्या षटकात दुस-या चेंडूवर चेन्नईकडून सलामीला आलेला गत सामन्यात वादळी खेळी करणारा डेवॉन कॉन्वेला चुकीच्या पद्धतीने पायचित म्हणून बाद देण्यात आले. चेंडू स्टम्पच्या बाजूने गेलेला असूनदेखील त्याला पंचांनी बाद दिले. त्यावर उपाय म्हणून कॉन्वेने डीआरएस घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मैदानात वीज उपलब्ध नसल्यामुळे त्याला डीआरएस घेता आला नाही. परिणामी बाद नसूनदेखील कॉन्वेला खातं न खोलताच तंबूत परतावं लागलं. कॉन्वे बाद झाल्यानंतर चेन्नईची पुरती दुर्दशा झाली. चेन्नईचे सर्वच फलंदाज ठराविक अंतरावर बाद झाले. अर्धा संघ बाद झालेला असताना चेन्नईच्या अवघ्या २९ धावा झाल्या होत्या. मोईन अली (०), महीश तीक्ष्णाही (०)बाद झाला. दुसरीकडे, ड्वेन ब्राव्होने १२, अंबाती रायुडू आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले.

मात्र, या खेळाडूंना आपल्या संघाला १०० धावांचा आकडा पार करून देता आला नाही. शेवटी चेन्नई संघ फक्त १६ षटकांमध्ये ९७ धावा करू शकला. या वेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना डॅनियल सॅम्सनने फक्त १६ धावा देत ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, जसप्रीत बुमराह आणि रमणदीप सिंग यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली. या विजयानंतरही मुंबई इंडियन्स गुणतालिकेत १०व्या स्थानी तर चेन्नई संघ ९व्या स्थानी आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश न करण्याची ही चेन्नईची दुसरी वेळ आहे.

-डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या