धार : महाराष्ट्राची एसटी बस मध्य प्रदेशातील धार इथे नर्मदा नदीत कोसळून १३ प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याची दु:खदायक घटना काल घडली होती. ही घटना स्वत: प्रत्यक्ष पाहणा-या नदीतील नावाड्याने हा थरारक अनुभव सांगितला आहे. माझ्या समोर ८० फूट उंचावरुन बस नदीत कोसळल्यानंतर बस टपापासून चाकापर्यंत अक्षरश: चेपली गेली होती. त्यानंतर बसमध्ये पाहिले असता त्यात ८ ते १० प्रवाशांचे मृतदेह होते, अशी माहिती त्याने दिली.
या घटनेचा साक्षीदाराने सांगितले की, मी नर्मदा नदीत नाव वल्हवत होतो. माझ्या डोळ्यासमोर ८० फुटांवरील पूलावरून एक बस नदी पात्रात कोसळली. त्यानंतर मी तात्काळ बसच्या दिशेने नाव वळवली. सुमारे दहा मिनिटांनंतर मी घटनास्थळी पोहोचलो. यावेळी माझ्यासोबत माझा एक सहकारी देखील होता. बस उलटल्यानं पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. केवळ तिचे काही चाके वर दिसत होती. पाण्यातील दगडांवर कोसळल्याने ती टपापासून चाकांपर्यंत चेपली गेली होती. बसचा काही भाग तुटून विखुरला होता.
आम्ही बसमधील चादर हटवण्याचा प्रयत्न केला तर माझा हात कापला गेला. आम्ही मृतदेह कसेबसे बाहेर काढत होते. आतमध्ये डोकावून पाहिले तर ८ ते १० मृतदेह पडलेले नजरेस पडले. एक महिला खिडकीच्या जाळीला अडकून पडली होती. तिला बाहेर काढण्यासाठी खिडकीतून हात आतमध्ये टाकत जाळी तोडावी लागली. मोठ्या प्रयत्नानंतरही त्या महिलेला बाहेर काढण्यात अयशस्वी ठरलो. त्यानंतर बचाव पथक दाखल झाले आणि बचाव मोहीम सुरु झाली. असा हा भयानक प्रसंग नाविक नरसिंग यांनी सांगितला.